मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या पुरस्कारांची घोषणा 'प्रेरणा प्रतिष्ठान'च्या वतीने करण्यात आली आहे. प्रतीवर्षी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून दिले जाणारे हे पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी जाहीर केले आहेत.
प्रतिष्ठेचा समजला जाणारा कै. ज्ञानेश्वर षडानन जडे स्मृती 'बहुश्रुत वाचक' पुरस्कार मूळचे मंगळवेढ्याचे असलेले, कोल्हापूर येथील नाईट कॉलेजचे मराठी विभागप्रमुख, विचारवंत व प्रख्यात व्याख्याते डॉ. अरुण शिंदे यांना जाहीर झाला आहे.
तसेच, स्व. इंदुमती ज्ञानेश्वर जडे स्मृती 'वाचन प्रेरणा' पुरस्कार रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर) येथील साहित्यिक, परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष तथा'शिवशाही न्यूज नेटवर्क'चे संपादक, आणि अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय, वाचन संस्कृतीला बाल व तरुण वयातच प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या 'युवा वाचक पुरस्काराने' डोंबिवली येथील विद्यार्थिनी समृद्धी दामले यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सचिन कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव
सचिन कुलकर्णी हे पत्रकार व छायाचित्रकार म्हणून कार्यरत असून, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. कथा, कविता व गझल या माध्यमातून दर्जेदार साहित्यनिर्मिती करणाऱ्या कुलकर्णी यांनी 'परिमल सांस्कृतिक व्यासपीठा'च्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम राबवून साहित्य चळवळ अत्यंत जोमाने गतिमान केली आहे.
स्वतः उत्तम वाचक असलेले सचिन कुलकर्णी यांनी शेकडो पुस्तकांचा दांडगा अभ्यास तर केलाच आहे, शिवाय त्यांच्याकडे एक समृद्ध आणि दर्जेदार पुस्तकांचा संग्रह देखील पाहण्यासारखा आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि ती अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षांपासून अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सत्कारादरम्यान फुलांच्या गुच्छांऐवजी पुस्तके स्वीकारण्याचा व देण्याचा पायंडा त्यांनी पाडला असून, विविध ग्रंथालयांना ते सातत्याने पुस्तके भेट देत असतात. त्यांच्या याच निरंतर व प्रेरणादायी साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना 'वाचन प्रेरणा' पुरस्कार जाहीर झाला आहे.
लवकरच होणार पुरस्कार वितरण
या सर्व पुरस्कारांचे वितरण लवकरच मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक पार पडणार आहे, अशी माहिती प्रेरणा प्रतिष्ठानचे सचिव प्रा. विश्वनाथ ढेपे यांनी दिली आहे. यावेळी प्रतिष्ठानचे संचालक ए. बी. शेख, संभाजी सलगर, दिगंबर भगरे, रेखा जडे आणि अर्चना सलगर आदी उपस्थित होते. सचिन कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

