परीट समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी संघटनात्मक पातळीवर काम करण्याची संधी
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेश ननवरे यांची महाराष्ट्र धोबी (परीट) आरक्षण समन्वय समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर येथील आर. के. इन हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील परीट समाजाच्या विविध संघटनांना एका व्यासपीठावर आणून समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित प्रश्नांवर समन्वयाने काम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र धोबी (परीट) आरक्षण समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांना व्यापक स्तरावर वाचा फोडण्याची जबाबदारी आता गणेश ननवरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
समितीचे प्रमुख आशिष भाऊ कदम, अध्यक्ष देवरावजी सोनटक्के आणि मार्गदर्शिका तथा महाराष्ट्र महिला परीट धोबी सेवा मंडळाच्या अध्यक्षा रेखाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ननवरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी समितीचे कायदेशीर सल्लागार सुधीर खैरनार, कोषाध्यक्ष मुरलीधर शिंदे, महासचिव संतोष सवतीरकर आणि उपाध्यक्ष जयप्रकाश ननवरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश ननवरे यांनी यापूर्वी तालुका सदस्य, तालुकाध्यक्ष, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व संघटक, महाराष्ट्र धोबी (परीट) आरक्षण समन्वय समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेश संघटक म्हणून काम पाहिले आहे. परीट समाजाच्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून, समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मंत्रालय स्तरावर त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा अनुभव लक्षात घेता, प्रदेश उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून परीट समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, समाजाच्या विविध मागण्या आणि संघटनात्मक एकजुटीच्या दृष्टीने ननवरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, गणेश ननवरे यांच्या निवडीबद्दल आमदार अभिजीत आबा पाटील, आमदार सत्यजित दादा तांबे, शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलक ,माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, समाजाचे राज्य उपाध्यक्ष नामदेव नाना वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र परीट समाजाचे अध्यक्ष अजय दादा सोनटक्के, जय हिंद लोकचळवळीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुमित दादा भोसले आणि परीट समाजाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

