नवदुर्गा -३
संघर्षातून घडलेले स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व -: योगिताताई
लेखक सचिन सरतापे म्हसवड
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शेळकबाव येथील योगिता अरुण यादव हे संघर्षातून घडलेले, स्वाभिमानी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व. महिलांच्या प्रश्नांची जाणीव, वंचित घटकांप्रती संवेदनशीलता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. “स्वतःच्या पायावर उभे राहा आणि स्वाभिमानाने जगा” ही वडिलांनी दिलेली शिकवण त्यांच्या आयुष्याची जणू दिशादर्शक ठरली आहे.
योगिताताईंचे माहेरचे नाव लता तुकाराम अनुगडे. त्यांचे माहेर हनुमानगाव, पोस्ट उंब्रज, तालुका कराड, जिल्हा सातारा. बालपण अत्यंत आनंदात आणि सुखासमाधानात गेले. आई-वडील, चार बहिणी आणि एक भाऊ असे सात जणांचे कुटुंब. आर्थिक परिस्थिती मध्यम असली, तरी घरात कशाचीही कमतरता नव्हती. आई-वडिलांनी मुलांना प्रेम, संस्कार आणि आत्मविश्वास दिला.
त्यांचे वडील लष्करातून निवृत्त झाले होते. योगायोग असा की, त्यांचे पती अरुण यादव हेदेखील लष्करी सेवेत आहेत. वडिलांकडून त्यांना शिस्त, स्वावलंबन आणि स्वाभिमानाचे संस्कार मिळाले. “कोणावर अवलंबून राहायचे नाही आणि परिस्थिती कशीही असली तरी स्वाभिमानाने जगायचे,” ही शिकवण त्यांनी मनाशी घट्ट धरून ठेवली.
योगिताताई अभ्यासात सर्वसाधारण होत्या; मात्र खेळात त्यांचा विशेष उत्साह होता. कबड्डी, खो-खो, धावणे, गोळाफेक, रिले आणि लांबउडी अशा विविध क्रीडा प्रकारांत त्यांनी सहभाग घेतला. धावणे, गोळाफेक आणि लांबउडीमध्ये त्यांनी प्रमाणपत्रेही मिळवली. शाळेतील मैत्रिणींसोबतचा काळ त्यांच्या आठवणींच्या कप्प्यात आजही ताजा आहे. शाळेत जाताना बोरे-चिंचा गोळा करून खाणे, सुट्टीच्या दिवशी मनसोक्त खेळणे आणि मैत्रिणींसोबत केलेली धमाल,त्या आठवणी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आजही आनंद उमटतो. “गेले ते दिवस परत येत नाहीत,” याची जाणीव असूनही त्या बालपणाच्या आठवणी त्यांना आजही सुखावतात.
शालेय जीवनात त्यांचा एक गंभीर अपघात झाला होता. त्या प्रसंगातून त्या अक्षरशः मृत्यूच्या दारातून परतल्या. त्यामुळे आई-वडिलांचे त्यांच्यावर अधिकच प्रेम होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी आणि उणीव आजही मनाला चटका लावतात.
बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात असताना त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील रांजणगाव येथे जेबीएल कंपनीत त्यांनी नोकरी केली. नोकरीसोबत शिक्षण पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता; मात्र नोकरी आणि शिक्षणाचा ताळमेळ बसला नाही. परिणामी शिक्षण अपूर्ण राहिले. “मनात होते, पण परिस्थितीने साथ दिली नाही,” अशी खंत त्यांच्या मनात आजही आहे.
योग्य वयात अरुण यादव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसाराची सुरुवात चांगली झाली; मात्र अवघ्या काही महिन्यांत परिस्थिती बदलली. छोट्या-छोट्या गोष्टींचे मोठे प्रश्न केले जाऊ लागले. पती लष्करी सेवेत असल्यामुळे घरातील कुरबुरींची त्यांना पूर्ण कल्पना नसे. योगिताताईंच्या विरोधात चुकीची माहिती सांगून गैरसमज निर्माण केले जात. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद वाढत गेले आणि त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.
संयुक्त कुटुंब मोठे होते. घरात सुमारे बारा जण; त्यात सतत येणारे पै-पाहुणे, स्वयंपाक, घरकाम, शेती आणि गोठ्यातील १५-१६ जनावरांची देखभाल,कामाचा अक्षरशः डोंगर त्यांच्या अंगावर होता. एवढे करूनही समाधान नव्हते. “कष्टाला अंत नव्हता आणि कौतुकाला पारावार नव्हता,” अशीच परिस्थिती होती.
शेवटी या सततच्या जाचाला कंटाळून एक दिवस त्या माहेरी गेल्या आणि परत सासरी आल्याच नाहीत. तब्बल दोन वर्षे त्या आईजवळ राहिल्या. मात्र परिस्थिती कायमची तुटण्याऐवजी संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. महिला मंडळाच्या माध्यमातून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. समुपदेशन झाले आणि योगिताताईंना यापुढे कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला जाणार नाही, असे लेखी आश्वासन घेण्यात आले.
या घटनेने त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. त्यांना कायद्याची ताकद जाणवली. “कायदा हा केवळ पुस्तकातला विषय नसून अन्यायग्रस्त व्यक्तीच्या पाठीशी उभा राहणारे प्रभावी शस्त्र आहे,” हा विश्वास त्यांच्या मनात दृढ झाला. त्यानंतर महिलांना त्यांच्या अधिकारांची आणि कायदेशीर मार्गांची माहिती देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
आज योगिताताई सुखी संसार करत असून त्यांना दोन मुले आहेत. मात्र स्वतःच्या संघर्षाची जाणीव त्यांनी कधीही विसरली नाही. उलट त्या अनुभवातून त्यांनी इतर महिलांच्या वेदना समजून घेतल्या.
लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या योगिताताई आज शेळकबाव परिसरात विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. वंचित आणि दुर्बल घटकांतील महिलांना बचतगटांशी जोडणे, त्यांना संघटित करणे, शासकीय योजना व अधिकारांची माहिती देणे, महिला आणि मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, तसेच अभ्यासाबरोबरच खेळाचे महत्त्व सांगणे, अशी विविध कामे त्या मनापासून करतात.
सर्व जाती-धर्मांतील लोकांना सोबत घेऊन समाजप्रबोधन करण्यावर त्यांचा भर आहे. तळागाळातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे, हेच त्यांच्या सामाजिक कार्याचे केंद्र आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कडेगाव तालुका सेवादलाच्या पदाधिकारी म्हणून तसेच अग्रणी सोशल फौंडेशन, विटाच्या संघटिका म्हणून त्या कार्यरत आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व विकसित करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
भविष्यात वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, मानवी हक्क आणि संविधान साक्षरतेचे मोठे काम उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. “आपण गेल्यानंतरही आपल्या कामाची आठवण राहावी,” ही त्यांच्या मनातील प्रामाणिक इच्छा आहे.
राजकीय विचारसरणी काँग्रेसची असली तरी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे त्यांचे आवडते नेते आहेत. त्यांना ‘नायक’ हा चित्रपट आवडतो; मात्र कोणताही अभिनेता त्यांचा हिरो नाही. त्यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे नायक! महिलांनीही राणी लक्ष्मीबाई आणि राजमाता जिजाऊ यांच्या धैर्याचा आदर्श घेतला पाहिजे, असे त्या मानतात.
त्यांचा विश्वास स्पष्ट आहे.महिला सुरक्षित, स्वाभिमानी आणि सन्मानाने जगल्या, तरच सक्षम समाजाची निर्मिती होईल. “जशी पेरणी तशी उगवण” या म्हणीप्रमाणे आजच्या मुलींना स्वाभिमान, शिक्षण, धैर्य आणि संविधानिक मूल्यांचे संस्कार दिले, तर उद्याच्या समाजात अनेक कर्तृत्ववान आणि निर्भय महिला घडतील.
बालपणीच्या आनंदी आठवणी, आयुष्यातील कठीण प्रसंग, अन्यायाचा अनुभव आणि त्यातून मिळालेली कायद्याची जाणीव,या सगळ्यांनी योगिता अरुण यादव यांचे व्यक्तिमत्त्व घडवले आहे. स्वतःच्या संघर्षातून शिकून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. संघर्षाने त्यांना थांबवले नाही; उलट त्याच संघर्षाने त्यांना इतरांसाठी लढण्याची ताकद दिली.

