सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
युवा क्रांती फौंडेशनचे संस्थापक मा. रविंद्र सूर्यवंशी, मा राजेश्वर हेंद्रे, मा. शिवाजी शेलार यांचा सल्ला घेऊन आरळे शाळेत ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ उपक्रमातून महाआनंददायी शनिवार
आरळे, ता. जि. सातारा : वसुधा फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने आयोजित ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा – आरळे येथे आनंददायी शनिवार उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. साहित्य, कला, मनोरंजन, संस्कार आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा शनिवार विद्यार्थ्यांसाठी ‘महाआनंददायी शनिवार’ ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुधा फाऊंडेशन पुणेच्या अध्यक्षा सौ. वसुधा वैभव नाईक होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पाठ्यपुस्तकातील कवी श्री. राम घडे उपस्थित होते. तसेच राजयुवा प्रकाशनचे अध्यक्ष गौरव पुंडे, काव्ययोग काव्यसंस्थेचे अध्यक्ष योगेश हरणे आणि युवा कवयित्री सायली ढेबे यांची उपस्थिती लाभली. माझं कवितांचं गाव – जकातवाडीचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे सर व उपाध्यक्ष श्री. विश्वास नेरकर सर यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘रमाची पाटी’ हा चित्रपट दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी चित्रपटाचा मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर चित्रपट तसेच साहित्याशी संबंधित विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या प्रश्नमंजुषेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि त्यांना विचार करण्याची संधी मिळाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी व उपस्थित साहित्यिकांनी आनंददायी बालगीते आणि कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कविता व बालगीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल दिसून येत होते.
वसुधा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. वसुधा वैभव नाईक यांनी विद्यार्थ्यांना वही, खोडरबर, शार्पनर व पेन्सिल यांचे वाटप केले. तसेच पालकांना पुस्तके भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याची आणि पालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील सुंदर हेतू होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक सौ. सुषमा दिलीप आलेकरी यांनी विशेष नियोजन व मार्गदर्शन केले. उपशिक्षिका सौ. रंजना चौरे मॅडम यांनीही मोलाचे सहकार्य केले. शाला व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रियांका भोसले, समितीचे सदस्य व पालक यांनी हिरिरीने सहभाग घेतला.
कार्यक्रमानंतर सर्वांनी सुंदर स्नेहभोजनाचा आनंद घेतला.'माझं कवितेचे गाव'जकातवाडीला भेट दिली.साहित्यिक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील स्नेह अधिक दृढ झाला.शिक्षणासोबत साहित्य, कला, संस्कार आणि आनंद यांची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. ‘वाचा, विचार करा, व्यक्त व्हा आणि आनंदाने शिका’ हा संदेश देत आरळे शाळेतला हा ‘आनंददायी शनिवार’ खऱ्या अर्थाने महाआनंददायी शनिवार ठरला.

