नवदुर्गा -2
जिद्दीच्या बळावर कर्तृत्वाची वाट: शबानाताई
लेखक - सचिन सरतापे म्हसवड
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मनात जिद्द, कष्टाची तयारी आणि नियोजनाची साथ असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सोनकिरे ता.कडेगाव येथील अंगणवाडी सेविका शबाना गणिहुसेन शिकलगार.
माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी प्रेम, संस्कार आणि सहकार्याने समृद्ध अशा कुटुंबात त्यांचे बालपण गेले. चार बहिणी आणि एका भावाच्या सहवासात त्यांना आनंदी बालपण लाभले. अभ्यासात सामान्य असल्या तरी खेळ आणि हस्तकलेत त्या विशेष कुशल होत्या. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा विवाह गणिहुसेन शिकलगार यांच्याशी झाला. फॅब्रिकेशन व वेल्डिंग व्यवसाय करणारे पती समंजस, दिलदार आणि प्रोत्साहन देणारे असल्याने संसाराचा प्रवास आनंदाने सुरू झाला.
आर्थिक अडचणी, मर्यादित उत्पन्न, घर-जमीन आणि कर्जाच्या जबाबदाऱ्या अशा अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी संसाराचा गाडा नेटाने पुढे नेला. काटकसरीचे आणि नियोजनबद्ध जीवन जगत कर्जांची परतफेड केली. मात्र या संघर्षाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होऊ दिला नाही. दोन्ही मुलांना इंजिनिअरिंगचे शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुलगा आणि मुलगी पुण्यात स्थिरावले असून, त्यांच्या यशातच शबाना यांच्या कष्टांचे खरे सार्थक झाले आहे.
अंगणवाडी सेविका म्हणून काम करताना त्यांचा गावातील महिलांशी सातत्याने संपर्क आला. त्यांच्या अडचणी जवळून समजल्याने शबाना यांनी सामाजिक कार्याची वाट धरली. बचत गटांच्या सचिव म्हणून महिलांना व्यवसाय व उद्योगासाठी कर्ज मिळवून देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, तसेच पाणलोट समितीच्या कामात सक्रिय सहभाग घेणे, अशी त्यांची सामाजिक बांधिलकी आजही सुरू आहे. गावातील बचत गटांना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून मतदार नोंदणीच्या कामात कडेगाव तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान झाला आहे. दुरवस्थेत गेलेल्या अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेली. स्थानिक दबाव, मतभेद आणि अडचणी आल्या; पण त्यांच्यासमोर त्या कधीही झुकल्या नाहीत.
जीवनात सासूबाईंचे निधन हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद काळ ठरला. आईसमान मायेची सावली हरपल्याने त्या काही काळ खचल्या; मात्र पुन्हा स्वतःला सावरून त्या उभ्या राहिल्या. त्याउलट मुलीने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी मिळवून नोकरी मिळवली, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण ठरला. त्यांच्या जीवनप्रवासात पती गणिहुसेन यांची साथ, प्रोत्साहन आणि विश्वास हा सर्वांत मोठा आधार राहिला.
कुराण हे त्यांचे आवडते पुस्तक असून नमाज पठण, कविता लेखन, सामाजिक कार्य आणि पर्यटन हे त्यांचे छंद आहेत. डॉ. पतंगराव कदम आणि संग्रामभाऊ देशमुख यांच्याविषयी त्यांना विशेष आदर आहे; तर आमिर खान आणि टायगर श्रॉफ हे त्यांचे आवडते अभिनेते आहेत.
आज मुलांचे भविष्य घडवण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या स्वप्नांना पूर्णविराम मिळालेला नाही. सोनकिरे येथे स्वतःची जागा घेऊन सर्व सोयींनी युक्त घर उभारण्याचे त्यांचे पुढील स्वप्न आहे. त्याचबरोबर गावातील वंचित घटकांतील आणि एकल महिलांना स्वावलंबी करण्यासाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
संघर्षातून शिकणे, कष्टातून उभे राहणे आणि मिळालेल्या यशाचा उपयोग इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी करणे—हीच शबाना शिकलगार यांच्या जीवनाची खरी ओळख आहे. कोणतीही कटुता मनात न ठेवता सकारात्मकतेने पुढे जाणाऱ्या शबाना यांचा जीवनप्रवास ग्रामीण स्त्रीच्या जिद्दीला, कर्तृत्वाला आणि सेवाभावाला अधोरेखित करणारा आहे.
“कष्टांची शिदोरी, जिद्दीची साथ आणि सेवाभावाची दिशा—यातूनच त्यांनी आपल्या आयुष्याला कृतार्थतेचा अर्थ दिला.”

