महाराष्ट्रातील रबी हंगामासाठी केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी
यांत्रिकीकरण व सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी ५०० कोटींचा निधी;
नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील विविध भागांत यंदा कमी व असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रबी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली.
राष्ट्रीय कृषि संमेलन –रब्बी अभियान २०२६ च्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत त्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली. या परिषदेला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर व भागीरथ चौधरी, केंद्रीय कृषी सचिव अतीश चंद्रा, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांच्यासह विविध राज्यांचे कृषिमंत्री, वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक आणि कृषी क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शेतकरी कमी पावसाच्या परिस्थितीमुळे सध्या अडचणीत असून, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पाहणी दौरा करण्याचे ठरवले आहे. त्यांनी लवकरात लवकर हा पाहणी दौरा करावा, अशी विनंती कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी केली. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाने आवश्यक ती मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर आगामी रबी हंगामात जमिनीतील ओलाव्याच्या कमतरतेचे आव्हान राहणार आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी आणि जमिनीतील ओलावा यानुसार पिकांची निवड करून शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे श्री. भरणे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील परिस्थितीमुळे हरभरा, गहू, रबी ज्वारी, करडई तसेच विविध तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. हवामान बदल, पावसातील खंड, वाढते तापमान आणि अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा कृषी उत्पादनावर थेट परिणाम होत असल्याने हवामान व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांच्या आधारे कृषी नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे काही पिके वरून हिरवी दिसत असली तरी त्यामध्ये अपेक्षित उत्पादन नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

