श्री स्वामी समर्थ हे केवळ दैवत नसून महाराष्ट्राच्या मनामनात असलेले एक प्रचंड ऊर्जास्रोत - सचिन मोरे
प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते सचिन मोरे यांचा सपत्निक सत्कार.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशल्य गवंडी तेज न्यूज
येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ दैवत नसून महाराष्ट्राच्या मनामनात असलेले एक प्रचंड ऊर्जास्रोत असल्याचे मनोगत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
मा.राजसाहेब ठाकरे यांचे मुख्य स्वीय सहाय्यक सचिन मोरे यांनी व्यक्त केले.
नुकतेच सचिन मोरे यांनी आपल्या पत्नीसमवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला भेट देवून श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश मालक इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते स्वामींची प्रतिमा, प्रसाद आणि कृपावस्त्र देऊन सचिन मोरे यांचा सपत्निक यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना सचिन मोरे म्हणाले की अक्कलकोटला आल्यानंतर मनाला विलक्षण शांतता मिळते. राजसाहेब ठाकरे देखील स्वामींचे निस्सीम भक्त आहेत. साहेब नेहमी सांगतात की, संकटकाळी स्वामींचं नाव घेतलं की मार्ग सापडतो. राजसाहेबांच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने आज मी स्वामी चरणी नतमस्तक झालो. महेश मालक इंगळे आणि प्रथमेश मालक यांनी करत असलेले भाविकांसाठीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. महेश मालक इंगळे यांच्या अंगी असलेली नेतृत्व क्षमता ही श्री स्वामी समर्थानी त्यांना दिलेली मोठी देणगी आहे. साधारण जवळ जवळ ३० वर्षांपुर्वी
नगरसेवक महेश इंगळे यांच्या अंगी असलेली नेतृत्व क्षमता पाहून राजसाहेब ठाकरे यांनी महेश मालक इंगळे यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती.
सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सेवेत महेश मालक इंगळे ही व्यक्ती भविष्यात नक्कीच आपले नाव उज्वल करेल असे त्यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी ठासून सांगीतले होते.
राजसाहेब ठाकरे यांचा स्वामींवरील विश्वासाबद्दल सचिन मोरे पुढे म्हणाले की
राजसाहेबांची श्री स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना किंवा कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी ते स्वामींचे स्मरण करतात. 'अशक्य ही शक्य करतील स्वामी' हा मंत्र घेऊनच साहेब महाराष्ट्राच्या हितासाठी लढत असतात. स्वामींचा आशीर्वाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना असल्याचे मनोगतही शेवटी सचिन मोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, मनसे तालुका नेते मल्लीनाथ पाटील, तुषार मोरे आदींसह सेवेकरी व भाविक उपस्थित होते.

