सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील ४ थे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयाने भिडे यांनी भाडेकरू कार्यकर्ते यांच्याविरोधात दाखल केलेला जागेच्या ताब्याचा नियमित दिवाणी दावा सखर्च फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रतिवादी कार्यकर्ते यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वादी भिडे यांनी ऑगस्ट २०१२ मध्ये प्रतिवादी कार्यकर्ते यांच्याविरोधात जागेचा ताबा मिळविण्यासाठी दावा दाखल केला होता. सी-ब्लॉकमधील गाळा क्रमांक सी-६ तसेच बी-ब्लॉकमधील खोल्यांची इमारत जुनी व धोकादायक झाल्याचे सांगत सोलापूर महानगरपालिकेने इमारत पाडण्याची नोटीस दिल्याचा दावा वादीने केला होता. नवीन बांधकाम करण्यासाठी जागेचा ताबा आवश्यक असल्याचे तसेच प्रतिवादीने जागेवर पक्के बांधकाम केल्याचेही वादीकडून न्यायालयात नमूद करण्यात आले होते.
प्रतिवादींची बाजू ठरली महत्त्वाची
प्रतिवादी कार्यकर्ते यांच्या वतीने ॲड. श्रीनिवास कटकूर व ॲड. आकाश आयंची यांनी न्यायालयात बाजू मांडली. इमारतीमध्ये कोणतेही बेकायदेशीर अथवा पक्के बांधकाम करण्यात आलेले नसल्याचे प्रतिवादींच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
तसेच वादीने जागेची वास्तविक व प्रामाणिक गरज (Bonafide Requirement) न्यायालयासमोर सिद्ध केलेली नाही, कारण वादी स्वतः पुणे येथे वास्तव्यास असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. इमारत धोकादायक असल्याबाबत महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष कारवाई झालेली नसून, त्यासंदर्भातील खात्रीशीर स्ट्रक्चरल ऑडिट अहवालही न्यायालयात सादर करण्यात आलेला नसल्याचे प्रतिवादींच्या वकिलांनी मांडले.
प्रतिवादी नियमितपणे दरमहा १,६७० रुपये भाडे भरत असून, त्यांच्याकडे राहण्यासाठी अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
प्रतिवादींचे नुकसान होण्याची शक्यता
प्रकरणातील विविध बाबींचा विचार केल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींची बाजू ग्राह्य धरली. जागेचा ताबा वादीस दिल्यास प्रतिवादी कार्यकर्ते यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
अखेर मे. न्यायालयाने वादी भिडे यांचा जागेचा ताबा मिळविण्याचा तसेच नुकसानभरपाईचा दावा सखर्च फेटाळून लावला (Dismissed with Costs). या निकालामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या वादाला न्यायालयीन पातळीवर महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
प्रकरणाचा संक्षिप्त तपशील
न्यायालय : ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, सोलापूर
दावा : नियमित दिवाणी दावा
वादी : भिडे
प्रतिवादी : कार्यकर्ते
प्रतिवादींचे वकील : ॲड. श्रीनिवास कटकूर व ॲड. आकाश आयंची
प्रतिवादींचा पत्ता : सी-ब्लॉक, सी-६, भिडे कॉलनी, सोलापूर

