पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत अंतिम वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी "ॲनालिसिस अँड डिझाइन ऑफ आर सी सी स्ट्रक्चर्स युजिंग इटॅब्स" या विषयावर एक आठवड्याचा मूल्यवर्धित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम दि. २८ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये अंतिम वर्ष बी.टेक. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील ६४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना इटॅब्स सॉफ्टवेअरचा वापर करून बहुमजली आरसीसी इमारतींचे त्रिमितीय मॉडेलिंग, भार विश्लेषण, भारतीय मानकांनुसार संरचनात्मक विश्लेषण, बीम, कॉलम, स्लॅब, शिअर वॉल यांचे डिझाइन तसेच प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रत्यक्ष उदाहरणांवर आधारित सराव करून आधुनिक संरचना डिझाइनची कौशल्ये आत्मसात केली.
या मूल्यवर्धित कार्यक्रमाचे समन्वयक व प्रशिक्षक प्रा. गणेश लकडे यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देत इटॅब्स सॉफ्टवेअरच्या प्रगत वैशिष्ट्यांची माहिती दिली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडून त्यांची उद्योगक्षेत्रातील रोजगारक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक डिझाइन सॉफ्टवेअरचे ज्ञान आत्मसात करून उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी अशा मूल्यवर्धित कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात आवश्यक असलेली कौशल्ये प्राप्त होत असून, भविष्यातील करिअरसाठी ते अधिक सक्षम बनतात, असे सांगून विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सहभागी विद्यार्थ्यांनी अशा उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

