पंढरपूर प्रतिनिधी शिवकुमार भावलेकर तेज न्यूज
भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभर फडकविणारे श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज व परिवार तसेच संत जनाबाई महाराज यांच्या 676 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आषाढ वद्य 1 गुरुवार दि. 30 जुलै ते श्रावण शु. 10, शनिवार दि. 22 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी दिली.
यावर्षी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 676 वा संजीवन समाधी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र पंढरपुरातील संत नामदेव मंदिर (जन्मस्थान) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अांले आहे. अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे 5 वाजता काकड आरती, भजन, सकाळी 7 ते 10 वाजता संत नामदेव महाराज गाथा भजन, सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत किर्तन, दुपारी 3.30 ते 5 वाजेपर्यंत प्रवचन व नंतर हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत किर्तन व रात्री जागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मुख्य धार्मिक कार्यक्रमाच्या अंतर्गत आषाढ व. 11, रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी दिंडीची नगर प्रदक्षिणा, सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी क्षिरापत, आषाढ व. 13 मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता संत नामदेव महाराज, संत जनाबाई महाराज व परिवार तसेच संत सावता माळी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे किर्तन होणार आहे.
दुपारी 1 वाजता पुष्पवृष्टी व आरती झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री केशवराज, संत नामदेव महाराज, जनाबाई यांना नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्यावतीने भाविक, नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
आषाढ व. 30 बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी ह.भ.प. नामदास महाराज यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता पालखी लवाजम्यासह दिंडीची नगर प्रदक्षिणा होणार आहे.
सदरचा अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक सोहळा संत नामदेव महाराजांचे वंशज सर्वश्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, केशव महाराज, कृष्णदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून यासाठी सर्वश्री ह.भ.प. एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज, मुरारी महाराज, विठ्ठल महाराज, हरि महाराज, केदार महाराज, भावार्थ महाराज, आदित्य महाराज यांच्यासह संत नामदेव महाराज वंशज, नामदास महाराज परिवार, संत नामदेव महाराज फड, संत नामदेव-जनाबाई महाराज सेवा प्रतिष्ठान, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर हे परिश्रम घेत आहे. वरील सर्व धार्मिक कार्यक्रमास संत नामदेव महाराज भक्त परिवार व समस्त शिंपी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नामदास महाराजांनी केले आहे.
11 ऑगस्ट रोजी उत्सवाचा मुख्य दिवस
यावर्षी रविवार दि. 9 रोजी एकादशी असून दिनदर्शिकेमध्ये (कॅलेंडर) सोमवार दि. 10 रोजी संत नामदेव महाराज समाधी सोहळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र वारकरी, फडकरी प्रथेनंतर एकादशीनंतर द्वादशी दिवशी क्षीरापतीचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे आषाढ व. 13, मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी दिली.

