पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्लेसमेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची आणि कौशल्याची छाप उमटवली आहे. महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील नेहा रमेश रोकडे, साक्षी महेश मोहोळकर, प्रथमेश मिनाजी जाधव, श्वेता माने तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील यशराज मधुकर भोसले या पाच विद्यार्थ्यांची सॉफ्टेंजर कंपनीत निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४.५ लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज मिळाले आहे.
महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाच्या गरजेनुसार घडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा या यशात मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाला व्यावहारिक कौशल्यांची जोड देत कोडिंग प्रॅक्टिस, ॲप्टिट्यूड ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, इंडस्ट्री एक्स्पर्ट सेशन्स, करिअर गाईडन्स आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या उपक्रमांवर विशेष भर दिला जातो.
उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नियमित तांत्रिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंटपूर्व मार्गदर्शन दिले जाते. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत ते यशस्वी ठरत आहेत. पंढरपूर परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच नामांकित कंपन्यांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालयाने सातत्यपूर्ण यश मिळविले आहे.
या निवडीची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या प्लेसमेंटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरची परंपरा अधिक बळकट झाली आहे.

