पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेतर्फे यंदाच्या आषाढी वारी 2026 मध्ये सोलापूर जि.प शिक्षण विभागाचे मा. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या प्रेरणेने व श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 10,000 सिडबॉल (बीज चेंडू) चे पंढरपूरातील 65 एकर परिसरात वाटप करण्यात आले.
प्रशालेचे प्राचार्य अविनाश कटकधोंड , माजी नगरसेवक संजय निंबाळकर,शिक्षक प्रतिनिधी श्रीकांत चंदनशिवे, सहशिक्षक प्रथमेश गावडे, राहुल शिंदे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींच्या हस्ते परतीच्या प्रवासाला चाललेल्या भाविक- वारक-यांना सिडबॉलचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य कटकधोंड यांनी मा. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या प्रेरणेने केलेल्या सीडबॉल मागची कल्पना, त्याचे महत्त्व विशद केले. शिक्षणाधिका-यांच्या 10 लाख सिड बाॅलच्या निर्मिती व वितरणाच्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व शाळांप्रमाणेच आम्हीही सकारात्मक प्रतिसाद देत, विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून मोठ्या प्रमाणात या सिड बाॅलची निर्मिती केल्याचे सांगत,या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, जबाबदारी निर्माण होऊन निसर्ग रक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे सांगितले.
कलाध्यापक श्रीकांत चंदनशिवे यांनी 'शिक्षण आणि सेवा' या व्रताने कार्यरत असणाऱ्या संस्था व प्रशालेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांबात उपस्थित सर्व वारकऱ्यांना माहिती देऊन, वाढते प्रदुषण, अनियमित व घटलेले पर्जन्यमान,वाढते तापमान याला आळा घालण्यासाठी,पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी वारकऱ्यांनी या बीजचेंडू मार्फत झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी व पर्यायाने निसर्गाचा समतोल राखावा असे आवाहन केले.
प्रथमेश गावडे यांनी उपस्थित वारकऱ्यां बरोबरच पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सिड बाॅलचे वाटप करत "झाडे लावा, झाडे जगवा", "बोला विठ्ठल जय हरी, किमान एक झाड लावा दारी", या घोषणा व "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या या संत वचनांचे दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन करत झाडे लावण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रशालेच्या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, दिलीप घाडगे,अनिरुद्ध सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर, मुकुंद गिरी, सुनीता मोरे आदींनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.यावेळी अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी बीज चेंडूचे वाटप करत पर्यावरणपूरक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

