मोरोची प्रतिनिधी तेज न्यूज
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवार दिं १९ रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत असला तरी अनेक वारकरी व दिंड्या एक दोन दिवस पुढे चालतात. शनिवार दिं १८ रोजी दिवसभर पावसाची रिपरिप चालू असल्याने अनेक दिंड्या निवारा शोधत असतात.
मोरोची येथील मराठी शाळा, हायस्कूल व श्री मोरजाई देवीचा सभामंडप असे एकत्रितपणे मोठे पटांगण व निवारा आहे त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी अनेक दिंड्या मुक्कामाला थांबतात. पालखी महामार्ग वरुन जात असल्याने बायपासने येऊन गावातील पुला खालून या दिंड्या व वारकरी या शाळेच्या व मंदिराच्या पटांगणावर येतात. परंतु चालू वर्षी या पुला खाली मुद्दामपणे शनिवारी बाजार भरवला गेला त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहीला. परिणामी दिंड्याची वाहने व वारकरी यांना या अगदी सुरक्षित निवाऱ्या पर्यंत पोहचता आले नाही. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस एकत्रितपणे पालखी मार्गावरील चार दिवस अगोदर अतिक्रमणे काढतात परंतु चालू वर्षी त्यांनी सुध्दा पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढली नाहीत.
त्यामुळे या पुलाखाली प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची व वारकऱ्यांची मागणी आहे.

