मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडवून देणारी शिकवणारे प्राध्यापक नाहीत, शिकणारे विद्यार्थी नाहीत तरीही महाविद्यालये सुरु असल्याचा प्रकार महाराष्ट्रात समोर आला आहे. विशेष म्हणजे ही अशाप्रकारेची एक दोन नव्हे तर तब्बल 123 महाविद्यायले राज्यात असल्याची कबुली विधान परिषदेमध्ये सरकारनेच दिली आहे. राज्यात 123 बोगस महाविद्यालये सुरू आहेत असं सांगतानाच राज्य सरकारने ही महाविद्यालये कायद्याने आवश्यक असलेले किमान निकष पूर्ण न करता चालवली जात असल्याचंही नमूद केलं आहे.
◼️ *सर्वेक्षणातून समोर आली माहिती* किमान विद्यार्थी पट नाही, पात्र प्राध्यापक नाहीत, त्याचप्रमाणे शिक्षणासाठी आवश्यक प्रयोगशाळा, ग्रंथालये, मैदाने या सुविधाही नसलेली 123 बोगस महाविद्यालये राज्यात सुरू असल्याची बाब उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. सरकारनेच याविषयीची कबुली दिल्याने या महाविद्यालयांत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
◼️ कोणी प्रश्न विचारला आणि कोणी दिलं उत्तर? बोगस महाविद्यालयांविषयी निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान तारांकित प्रश्न उपस्थित केला. विद्यापीठांकडून संलग्नता प्रदान करताना किंवा तिचे नूतनीकरण करताना निकषांचे पालन होते की नाही याची खातरजमा करण्यासाठी शासनाकडून कोणती यंत्रणा कार्यरत आहे, बोगस महाविद्यालयांवर कोणती कारवाई करण्यात येते असा सवालही डावखरे यांनी उपस्थित केला. यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. यावरील लेखी उत्तरात पाटील यांनी कायद्यानुसार अनिवार्य निकष पूर्ण न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांची यादी सादर केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विविध विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा नाहीत. या महाविद्यालयांनी विविध राज्य सार्वजनिक विद्यापीठांतर्गत शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या निर्णयांची निकषांची पूर्तता केलेली नाही. अशा अनेक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या या बोगस महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे.
◼️या एका जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक बोगस महाविद्यालये
विशेष म्हणजे यातील सर्वाधिक बोगस महाविद्यालये छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. या 123 पैकी अर्ध्याहून अधिक महाविद्यालये छत्रपती संभाजीनगरमध्ये असून ही संख्या 81 इतकी आहे. त्या खालोखाल अमरावतीमध्ये 20, नागपूरमध्ये 12, नाशिकमध्ये 5 बोगस महाविद्यालये आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात 3, कोकणात 2 बोगस महाविद्यालये आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 च्या कलम 108 (संलग्नता आणि मान्यतेच्या अटी), कलम 117 (तपासणी) कलम 120 (मान्यता रद्द करणे) अंतर्गत कारवाई केली जात असल्याची माहितीही चंद्रकात पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

