मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
सोशल मीडियावर आपल्या रिल्समुळे लाखो चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारी ब्रह्मपुरी येथील रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या मृत्यूप्रकरणी अखेर २३ दिवसांनंतर महत्त्वाची घडामोड झाली आहे. मंगळवेढा पोलिसांनी तिचा पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
२६ मे रोजी ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र तपासादरम्यान आणि कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पतीकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाची बाब समोर आली.
फिर्यादीनुसार, रोहिणीची इच्छा नसतानाही पती गेल्या वर्षभरापासून तिला हॉटेलमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडत होता. याशिवाय घरगुती कारणांवरून वारंवार वाद, शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आत्महत्येनंतर या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. चाहत्यांनी आणि नागरिकांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


