पिलीव प्रतिनिधी तेज न्यूज
शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आज निमगाव (ता. माळशिरस) येथे शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. मोठ्या पोलीस फौजफाट्यासह आलेल्या प्रशासनाने गावात वेगवेगळ्या ठिकाणी मोजणी केली. यामध्ये काही ठिकाणची मोजणी झाली तर काही ठिकाणची शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबवण्यात आली आहे मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा, प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोजणी अधिकारी आणि पोलिसांचा मोठा ताफा निमगावमध्ये दाखल झाला. प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ आणि वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, नातेपुतेचे सपोनी विशाल वायकर हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
मोजणी थांबवण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी शेतकरी नेते आणि उपस्थित शेतकऱ्यांनी महामार्ग आणि भूसंपादनाबाबत प्रांताधिकारी व तहसीलदार यांना विविध कायदेशीर व तांत्रिक प्रश्न विचारले.प्रशासनाने मोजणी सुरू करून बहुतांश ठिकाणचे मोजणी पूर्ण केली असल्याची माहिती मिळत आहे.
उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनापुढे अनेक प्रश्न उपस्थित केले त्यांचे प्रश्न पाहता प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत तडजोड करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करणारे एक लेखी पत्रही दिले. निमगाव मध्ये ग्राउंड कंट्रोल पॉईंट च्या वेळी काही शेतकरी विरोध करीत होते तरी काही शेतकऱ्यांनी या अगोदरच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनाचे पत्र प्रांताधिकार्यांकडे सुपूर्द केले आहे यामुळे काही ठिकाणी विरोध होत आहे तर याच गावात दुसरीकडे शेतकऱ्यांचे शक्तिपीठ महामार्गाला समर्थनही मिळत आहे.
निमगावात ग्राउंड कंट्रोल पॉईंट घेत असताना काही लोकांनी विरोध केला पण या अगोदर याच गावातील जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी आपल्या समर्थनाचे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहे.यामुळे निमगावात या महामार्गास विरोध आहे असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे परंतु वस्तुस्थिती शक्तिपीठ महामार्ग समर्थनाची आहे.
किरण पाटील, ग्रा सदस्य निमगाव

