जोगेश्वरी पूर्व प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय, जोगेश्वरी पूर्व येथे २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आसनपूर्व तयारीसाठी विविध उद्योजक हालचाली (वॉर्म-अप व्यायाम) घेण्यात आल्या.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध उभी व बैठे योगासने तसेच योगाच्या हालचालींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमासाठी थ्राइव्ह फिट अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक हरेश्वर तांबडकर व योगशिक्षिका प्रतीक्षा शेट्ये यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगासने करून योगाचे महत्त्व जाणून घेतले.
यावेळी विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका रचना पवार यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देत नियमित योग केल्याने शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य सुदृढ राहते, असे मार्गदर्शन केले.
योगशिक्षिका प्रतीक्षा शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देताना, "स्वतःला कवेत घ्या, स्वतःलाच धीर द्या आणि मनोमन म्हणा – मी स्वतःवर प्रेम करतो, मी स्वतःचा सन्मान करतो, मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो." असे सांगितले. तसेच "स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर राखा आणि स्वतःची काळजी घ्या," असे आवाहन केले. त्यांच्या या संदेशाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात पालक व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. उपस्थितांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी माननीय मुख्याध्यापिका रचना पवार यांच्या हस्ते प्रशिक्षक हरेश्वर तांबडकर व प्रतीक्षा शेट्ये यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जागतिक योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


