मोहोळ प्रतिनिधी विजयकुमार मोटे तेज न्यूज
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेत केवळ ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची अट अन्यायकारक आहे. राज्यातील सुमारे ३३ लाख शेतकऱ्यांनी २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतला असून त्यांना यंदाच्या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अटही शेतकरीविरोधी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट अव्यवहार्य असल्याने ती रद्द करावी, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय २०१७ च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा, एक रुपयातील पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, तसेच पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून आवश्यक निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या.
गेल्या तीन वर्षांपासून नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने दिलासा देत कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी संजय क्षीरसागर यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते दादासाहेब पवार, बाळासाहेब वाघमोडे, सोमनाथ व्यवहारे, लिंगादेव व्हनमाने, डॉ. बाळासाहेब वाघमोडे, विलासप्रसाद तिवारी, दिलीप पवार, धनाजी गायकवाड, अभिजित खंदारे, किसन आवताडे, गणेश आतकरे, प्रसन्न पाटील, आप्पा राजगुरु, आनंद पाटील, प्रभाकर हावळे, पिंटू पवार, महादेव आवारे आदी उपस्थित होते.


