डोंबिवली प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
समाजात वेगवेगळ्या जाती धर्माची वधु-वर विवाह सुचक मंडळ कार्यरत आहेत.तसेच डोंबिवली येथेही भंडारी मंडळ विविध सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.भंडारी मंडळाचे स्वमालकीचे कार्यालय डोंबिवली स्टेशन जवळच आहे.तेथे मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.त्याच अनुषंगाने भंडारी मंडळ डोंबिवली तर्फे नुकताच आपल्या भंडारी समाजातील विवाह इच्छुक वधू-वर मेळावा प्रथमच आयोजित केला होता.सदर मेळाव्याकरिता स्थानिक इच्छुक तसेच ठाणे, मुंबई, बोरीवली, कल्याण, बदलापूर व कर्नाटक, गुजरात, अहमदाबाद येथून इच्छुकांनी हजेरी लावली होती.
या मेळाव्याला समाजातील इच्छुक मुला-मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या वधू-वर मेळाव्याचे सुत्रसंचलन मंडळाचे अध्यक्ष रजनीश चौगुले व विश्वस्त गोपाळकृष्णा वराडकर यांनी उत्तमरीत्या केले.या कार्यक्रमाला भंडारी समाजातील उद्योजक सन्मानिय शांतीधर पारकर,माजी नगरसेवक नंदकुमार मालवणकर व शिवसेना शहरप्रमुख श्रीमती किरण मोंडकर उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मंडळाचे विश्वस्त संजय पोखरणकर,रहुवीर तांडेल, प्रदीप तांडेल यांनी केले.प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व गणपतीच्या प्रतिमेला हार अर्पण व पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली.वधु-वर मेळाव्याला मुला-मुलींची उपस्थित लक्षणिय होती.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे खजिनदार अजित कांबळी, सरचिटणीस महेश पारकर, चिटणीस रविंद्र सातार्डेकर, उपाध्यक्ष बापू गोवेकर, सदस्य पांडुरंग पेडणेकर, ज्ञानेश्वर कांबळी, वैभव शिरोडकर, प्रदीप चुडनाईक, सचिव ज्ञानदेव जाधव आणि नव्याने मंडळात रुजू झालेले अभिषेक मुळगेकर यांनी तांत्रिक व संगणक बाबी उत्कृष्टपणे सांभाळून मंडळाला सहकार्य केले.
हा वधू-वर मेळावा व्यवस्थित संपन्न व्हावा याकरिता सौ.चौगुले,सौ.तांडेल,सौ.सातार्डेकर,सौ.शिरोडकर आणि सौ.पूनम अभिषेक मुणगेकर या महिलांनी सहभाग घेतला.उपस्थित पालकांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंडळाचे आभार मानून दरवर्षी असा कार्यक्रम करावा अशी विनंती केली.


