पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मातृदिनाचे औचित्य साधत आयआयटी कॉम्प्युटर्स पंढरपूर येथे एक आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या आईंना क्लासमध्ये आमंत्रित करून स्वतः संगणकाचे प्रशिक्षण दिले. “आई शिकली संगणक” या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
या विशेष उपक्रमामध्ये अनेक माता प्रथमच संगणकासमोर बसल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या आईंच्या हातात माउस देत संगणकाची प्राथमिक माहिती, इंटरनेटचा वापर तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयी माहिती दिली. स्वतःची मुले आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान शिकवत असल्याचे पाहून अनेक मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या प्रत्येक मातांचे गुलाब पुष्प व थंड कोकम ज्यूस देऊन स्वागत करण्यात आले. मातृदिनाचे औचित्य साधून आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहिणी मांजरे, दीपाली आसबे व सोनाली कळकुंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी दत्ता कळकुंबे यांनी उपस्थित सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संचालक नितीन आसबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून “आई आणि तंत्रज्ञान” यांची सुंदर सांगड घालणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


