बार्शी प्रतिनिधी तेज न्यूज
लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी तथा पालखी सोहळा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना यावर्षीचा (२०२६) प्रतिष्ठेचा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंढरपूर व जळगाव येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळ्यातील कार्य तसेच भागवत धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा संस्थेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने गौरव करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा, शाल, श्रीफळ व संत मुक्ताबाई चरित्र ग्रंथ असे आहे.
यावर्षीचा पुरस्कार शहाजी फुरडे-पाटील यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
शहाजी फुरडे-पाटील हे गेली वीस वर्षे लोकमतचे बार्शी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथील रहिवासी असलेल्या फुरडे-पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांची वारकरी परंपरा भक्तिभावाने जपली आहे. माध्यम क्षेत्रात कार्य करताना त्यांनी मागील १८ वर्षांपासून पालखी मार्गावरील वारीचे सातत्यपूर्ण वार्तांकन करून भागवत धर्माचा विचार, प्रचार व प्रसार घरोघरी पोहोचविण्याचे कार्य केले आहे.
आषाढी वारीदरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज तसेच आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. इंदापूर ते पंढरपूर, फलटण ते पंढरपूर तसेच मुक्ताई सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वारी मार्गावरील विविध सामाजिक, धार्मिक व मूलभूत प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने लेखणी चालविली आहे. आषाढी एकादशी सोहळा, महापूजा आणि पंढरपूर शहरातील वार्तांकनही त्यांनी प्रभावीपणे केले आहे.


