सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
साताऱ्यातील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर पुरुष गटाची अंतिम लढत महाराष्ट्राच्याच दोन तगड्या मल्लांमध्ये रंगली. सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात प्रतिष्ठेची 'हिंदकेसरी गदा' पटकावण्यासाठी लढत झाली.
मात्र, कुस्तीच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी आणि नाट्यमय घडामोड घडली. डाव प्रतिडाव टाकत असताना महेंद्र गायकवाड याने पृथ्वीराज मोहोळचा हात पिळला. याच वेळी पृथ्वीराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हाताची वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पृथ्वीराज मोहोळ याने मैदानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्ध्याने माघार घेतल्यामुळे पंचानी महेंद्र गायकवाड याला 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित केले. महेंद्र गायकवाड याला मानाची चांदीची गदा आणि बक्षीस म्हणून तब्बल 'महिंद्रा थार' गाडी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या पृथ्वीराज मोहोळ याला ट्रॅक्टर देण्यात आला.
सेमीफायनलचा थरार
अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही मल्लांना उपांत्य फेरीत प्रचंड संघर्ष करावा लागला होता. उपांत्य फेरीत सामन्यात महाराष्ट्राच्या पृथ्वीराज मोहोळने दिल्ली एनसीआरच्या रजत याच्याशी दोन हात केले. पृथ्वीराजने रजतचा 6-2 अशा गुणांच्या फरकाने पराभव केला आणि फायनलमध्ये धडक मारली. तर, दुसरीकडे महेंद्र गायकवाड आणि दिल्लीचा अनिरुद्ध यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची झाली. दोघांनीही एकमेकांना तगडे आव्हान दिले होते. गुणांची चढाओढ सुरू असतानाच महेंद्र गायकवाडने आपल्या अफाट ताकदीच्या जोरावर दिल्लीच्या अनिरुद्धला चितपट केले. महेंद्रने हा सामना 9-7 अशा गुणांच्या फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
महिला गटात हरियाणाच्या काजलचा डंका
या स्पर्धेत महिला कुस्तीगिरांनीही आपल्या कौशल्याने सातारकरांची मने जिंकली. महिला गटाच्या अंतिम सामन्यात दिल्लीची खुशी दलाल आणि हरियाणाची काजल डोचक यांच्यात थेट लढत झाली. या सामन्यात हरियाणाच्या काजलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घेतला. तिने खुशी दलालला एकही गुण मिळवू दिला नाही आणि 7-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवत 'महिला हिंदकेसरी 2026' चा किताब आपल्या नावावर केला. या यशाबद्दल काजलला मानाची गदा आणि 'अल्टो' कार बक्षीस म्हणून देण्यात आली.


