पंढरपूर प्रतिनिधी प्रतिनिधी तेज न्यूज
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांचे ९०% काम कमी होणार असल्याने, २५-२६ मे रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर हमाल कष्टकरी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली.
राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने २४ एप्रिल २०२६ चे शासनादेशात, शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांचा थोडाही विचार न करता जी.आर. काढला आहे. परिणामी ३०-४० वर्षापासून गोदामात काम करणार्या हमालांची सुमारे ९०% काम कमी होणार आहे.
माथाडी कामगारांशी संबंधित कोणतेही काम असेल तर त्याचे नियंत्रण, नियोजन, वेतन, थकबाकी पगार करणे इ. बाबींची पूर्तता करण्याची जिम्मेदारी, कायद्याने जिल्हा माथाडी मंडळावर दिलेली असताना या जी.आर.मध्ये त्यांना संपूर्णरिता बेदखल केले आहे.
वेतन ठरवून पगार करण्याची जबाबदारी जर कायद्याने माथाडी मंडळावर दिली असेल तर जी.आर.द्वारे सदरील जबाबदारी काढून घेण्याचा अधिकारी पुरवठा विभागाला कोणी दिला? पुरवठा विभागाचे हे कृत्य बेकायदेशीर आहे म्हणून सरकारच्या या बेकायदेशीर कृत्याविरुद्ध, राज्यातील सर्व शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगार दि.२५ व २६ मे रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार आहेत.
सरकारने या प्रकरणी २६ मे पर्यंत ठोस निर्णय केला नाही तर,२७ मे पासून राज्यातील गोदामातील काम बंद करून, बेमुदत संप सुरू होईल असा इशाराही ऑनलाईन बैठकीत देण्यात आले.महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हरीश धुरट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, साथी विकास मगदूम, सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, सहचिटणीस हनुमंत बहिरट, साथी शिवाजी शिंदे, साथी रमझान पठाण, संघटक गोरख मेंगडे, संतोष नांगरे, कृष्णात चौगुले, गंगा भाऊ कोळेकर यांनी सहभाग घेतला.



