पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माणसाच्या दैनंदिन जगण्यात कलेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, कलेमुळे जीवनातील ताणतणाव कमी होतात आणि जीवन अधिक सुंदर व समृद्ध होते, असे प्रतिपादन राज्य पुरस्कारप्राप्त कलाध्यापक भारत गदगे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित ‘कला महोत्सव स्पर्धा २०२६’ च्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते. यावेळी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. समाधान माने, डॉ. बाळासाहेब बळवंत, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, डॉ. सुशील शिंदे तसेच स्वायत्त महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. आनंद शिंदे, युवा महोत्सव समिती प्रमुख प्रा. मारुती नायकू आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत गदगे यांनी विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील प्रवास, त्यासाठी लागणारी मेहनत व साधना याबाबत मार्गदर्शन केले. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कलाकाराची सातत्यपूर्ण साधना यावर त्यांनी विशेष भर दिला. यावेळी त्यांनी आकर्षक पेंटिंगचे प्रात्यक्षिक सादर केले, ज्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात असलेले महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनून जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात डॉ. समाधान माने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सागर नाईकनवरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला महोत्सव समितीतील सदस्य, विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

