धाराशिव प्रतिनिधी तेज न्यूज
महिला व बालकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी धाराशिव येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अंगणवाडी सेविकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या गरम ताजा आहार व कच्चा आहार याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अशी माहिती महाराष्ट्र राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे यांनी तेज न्यूजला दिली.
बैठकीदरम्यान झिरो ते तीन वयोगट, तीन ते सहा वयोगटातील बालक, गरोदर माता, स्तनदा माता तसेच एक ते पाच व सहा ते आठ या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता, नियमितता व पोषणमूल्य यांचा आढावा घेण्यात आला. अंगणवाडी केंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या आहाराची प्रत्यक्ष स्थिती, वितरणाची पद्धत तसेच लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा पोहोच याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
तसेच शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत व अंमलबजावणीतील अडचणींचाही विचार करण्यात आला. लाभार्थ्यांना वेळेवर, पौष्टिक व स्वच्छ आहार मिळावा यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी व अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्या.
ही संपूर्ण कार्यवाही राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष श्री ढवळे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली असून, त्यांनी सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच आहाराची गुणवत्ता टिकवून ठेवणे, पारदर्शकता राखणे आणि नियमित देखरेख करणे यावरही त्यांनी भर दिला.
या बैठकीमुळे महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सक्षम व परिणामकारक होण्यास मदत होणार असून, बालक व मातांच्या पोषण स्थितीत सकारात्मक सुधारणा घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

