पुणे प्रतिनिधी - गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहर महाराष्ट्रात ओळखल जात, दिनांक 18 मार्च 2026 रोजी , 8 मार्च रोजी साजरा झालेल्या जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून जनजागृती सेवा संस्था, ठाणे बदलापूर यांच्या वतीने एक अत्यंत देखणा सत्कार समारंभ पुणे येथील रितिका कॉम्प्लेक्स नऱ्हे रोड धायरी फाटा येथील कै. शालन शिवराम चव्हाण सभागृहामध्ये अत्यंत दिमाखामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडला. याप्रसंगी पुण्यामधील विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्ववान कार्याने समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या सेवाभावी आणि कर्तुत्व सिद्ध केलेल्या महिलांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.
हा गुणगौरव आणि सत्कार करण्यासाठी पुण्यामधील विविध क्षेत्रात भरारी घेणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्र, साहित्य, कायदा, कला क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुणे स्थित महिलांचा सत्कार करण्यात आला . गौरवांकित सर्व स्त्रियांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
डॉक्टर आम्रपाली मोहिते, व्यसनमुक्ती समुपदेशक, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या समस्येविका.. एडवोकेट अनिशा फणसळकर ज्येष्ठ विधीज्ञ आणि आमोदिनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष, प्राध्यापिका डॉक्टर भाग्यश्री जोगदेव, साहित्यिक ,शिक्षणतज्ञ , रेशा अभ्यंकर, मानसोपचार तज्ञ आणि सल्लागार, ज्योती नाळे, संपादिका दैनिक संध्या पुणे, शिवराम चव्हाण, डायरेक्टर-ॐग्रामण्ये इन्स्टिट्यूट, एडवोकेट सचिन देवांग संस्थापक कोष्टी व्हिजन ट्रस्ट , श्री रामजीत गुप्ता, मुख्य तपास अधिकारी, अँटी पायरोसी सेल, जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरुपणकर , संस्थेच्या सचिव संचिता भंडारी, खजिनदार दत्ता कडूलकर, उपाध्यक्ष महेश्वर तेटांबे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने सर्व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा देखील सत्कार गुलाब पुष्प, शाल, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन करण्यात आला. सर्वच मान्यवरांनी महिला दिनाचे औचित्य साधत स्त्रियांमधील क्षमता, स्त्री पुरुष समानतेमधून देखील स्त्रिया करत असलेले उल्लेखनीय कार्य, स्त्रियांचे खरे सक्षमीकरण, आपल्यामधील क्षमता सिद्ध करण्यासाठी कोणावरही अन्याय न करता स्वबळावर कसे पुढे जावे, स्त्रियांनीच स्त्रियांना पुढे जाण्यासाठी कसे प्रवृत्त करावे, स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही हिंदोळ्यावर जगताना देखील एक पुरुषांमधील स्त्री देखील स्वतःसाठी आणि समाजासाठी किती कळकळीने काम करू शकते, अशा विविध विचारांचे आदान प्रदान करत स्त्री खऱ्या अर्थाने अशा सन्मानास कशी पात्र आहे आणि हा गुणगौरव एक दिवसाचा न ठरता तो वर्षभर कसा साजरा करता येईल तसेच स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांचा आदर करत समाजाला कसे पुढे न्यावे याविषयी भाष्य करत सर्व प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवले. सर्वच मान्यवरांच्या उद्बोधक अशा विचारांमुळे प्रेक्षागृहातील उपस्थितांचे मन हेलावून गेले.
यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित राहिलेल्या सत्कारार्थी स्त्रियांचा सत्कार, सन्मान आणि गुणगौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना शाल, गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र तसेच आकर्षक पेन देऊन अत्यंत प्रेमाने करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्वेसर्वा गुरुनाथ तिरपणकर सर आणि त्यांचे पदाधिकारी मुंबईहून खास उपस्थित राहिले होते.संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या पाच वर्षातील कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सौ तिरपणकर वहिनी, श्री. शिवराम चव्हाण सर, या सर्वांनी खूपच कष्ट घेतले आणि कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे साजरा केला.कार्यक्रमानंतर उपस्थितानी आवर्जून असा कार्यक्रम घेऊन तो यशस्वी केल्याबद्दल गौरवोत्गार काढले.
जनजागृती सेवा संस्थेने पुण्यात घेतलेला हा कार्यक्रम अगदी मनापासून लक्षात राहील असाच होता. अशा दिमाखदार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याबद्दल सर्वांनी आपापल्या परीने आभार प्रकट केले. जनजागृती सेवा संस्थेचे हे कार्य निश्चितच अभिमानास्पद आणि कौतुकास पात्र आहे. जनजागृती ही संस्था खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जनजागृती करण्याचे महान कार्य करीत असून या संस्थेचे कार्य सर्वदूर लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यात आपला सहभाग असावा असं प्रत्येकाने सांगून संस्थेस शुभेच्छा दिल्या. जनजागृती संस्थेस मनापासून धन्यवाद आणि संस्थेची कीर्ती लोकोत्तर अशीच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छा, शुभेच्छा सत्कारमूर्तींनी दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेच्या सचिव संचिता भंडारी यांनी केले व आभार संस्थेचे उपाध्यक्ष महेश्वर तेटांबे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामजित(जितु) गुप्ता, संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर,रहुनाथ ढोक, शिवराम चव्हाण, ॲड.अनिशा फणसळकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.


