भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रतिनिधी तेज न्यूज
चैत्री वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथील बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केल्याने वारकरी व इतर प्रवाशांचे प्रचंड हाल होत असताना दिसून येतात,आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी पंढरपूर शहरात फेरफटका मारला असता निर्दशनास आले की चैत्री वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरावर वाहतूकीचा ताण पडून नये, म्हणून मुख्य बस स्थानक ३ - ४ ठिकाणी विभागून स्थलांतरित केले आहे, यामुळे वृध्द, महिला, लहान मुले मुली यांचे स्थलांतरित झालेले बस स्थानक शोधण्यासाठी व तेथे जाण्यासाठी खूप हाल होताना दिसतात, दिनांक २७ मार्च २०२६ ते दिनांक ३० मार्च २०२६ या अल्प कालावधीत ही गैरसोय करुन वारकरी व इतर प्रवाशांचे अतोनात हाल करून ठेवले आहेत.
आषाढी कार्तिकी वारीला परिस्थिती वेगळी असते, त्या मोठ्या यात्रा असल्याने पंढरपूर शहरातील वाहतुकीचा परिणाम होऊ शकतो पण चैत्री व माघी वारीला मात्र परिस्थिती तशी नसते .प्रवाशी उन्हात बस स्थानक शोधत सामान घेऊन जातांना पाहून खूप वाईट वाटते, अशा वेळी पंढरपूर शहरातील रिक्षा वाले मनमानेल तसे प्रवाशांकडून भाडे वसूल करुन आपले उखळ पांढरे करताना दिसतात.
तरी वारकरी व इतर प्रवाशांचे असे हाल होतील असे आदेश काढताना पंढरपूर एसटी महामंडळ ,व प्रशासकीय अधिकारी वर्गाने जरुर विचार करावा, आदेश काढण्यापूर्वी प्रवाशांचा विचार जरूर करावा, स्थलांतरित बस स्थानकात प्रचंड प्रमाणात धुळ, कोणत्याही गाड्या कुठे ही लावल्या जातात त्या मुळे अशिक्षित प्रवासी वर्गाची दैना होते, इच्छित गाडी शोधण्यासाठी प्रवासी इकडून तिकडे धावत असतो. त्यामुळे अपघात घडण्याची शकता होते.
खरे तर नेहमी प्रमाणे वेळेनुसार गाड्या जुन्या बस स्थानकावर व खास यात्रा स्पेशल गाड्या नवीन बस स्थानकावर सोय करणे आवश्यक होते. अचानक बस स्थानक बदल केल्या मुळे प्रवास करताना आर्थिक सह मानसिक ताण सहन करावा लागत आहे.महामंडळ व अधिकारी कसे नियोजन करतात.असा प्रश्न उपस्थित होत आहे.

