म्हसवड प्रतिनिधी विजय टाकणे तेज न्यूज
आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर - सातारा ते पंढरपूर मार्ग विषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद सदस्य, श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), सातारा जिल्हा भाजपचे निवडणूक प्रभारी धैर्यशीलदादा कदम, सातारा जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश धायगुडे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता आणि अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी आणि ५४८ ई सातारा ते लातूर आणि सातारा ते पंढरपूर या रस्त्याच्या सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या अपूर्ण कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माण तालुक्यातील धुळदेवसह गोंदवले, दिवड, पळशी, चिमणगाव येथील अपघातांचे ब्लॅक स्पॉट्स अधोरेखीत करुन त्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला.
सातारा - पंढरपूर - लातूर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा जिल्ह्यातील काम अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने असंख्य अपघात होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. नुकताच धुळदेव येथे भीषण अपघात होवून २ जणांचा मृत्यू झाला होता. याच ठिकाणी आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त अपघात होवून १५ जणाचा मृत्यू झाला आहे तर ६० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले असल्याचे या बैठकीत निदर्शनास आणून दिले.दिवड गावच्या हद्दीत पूलाचे अर्धवट काम पूर्ण होईपर्यंत डांबरीकरण करण्याच्या सुचना दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील उपरी येथेही ५० मीटर लांबीच्या अपूर्ण रस्त्यावर तात्पुरते डांबरीकरण करणे, गोंदवले येथील नियमापेक्षा अधिक ऊंच केलेले गतीरोधक काढून योग्य निकषाप्रमाणे गतीरोधक करण्याच्या सुचना दिल्या. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील ३० मीटर लांबीचा ब्लॅक स्पॉट अडचणीचा ठरत असल्याने तेथे डांबरीकरण करणे आणि पिलीव ते पंढरपूर दरम्यान ज्या ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण आहे तिथे डांबरीकरण करण्याच्या सुचना दिल्या. बैठकीत आवश्यक त्या ठिकाणी आठवड्यात डांबरीकरण, पर्यायी वळण मार्ग करण्याचे निर्णय घेण्यात आले.
धुळदेव येथील रस्ता आणि पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील पूलाचे काम डिसेंबर अखेर मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
नुकतीच धुळदेव अपघाताची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती या बातमीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या रस्त्याच्या प्रश्न लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली होती त्यानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा येथे तात्काळ रस्ते महामंडळ व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पंढरपूर सातारा रस्त्यावरील अर्धवट राहिलेले रस्ते व पुलाची कामे पूर्ण करण्यासाठी बैठक घेऊन आदेश दिल्याबद्दल तेज न्यूज परिवाराच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.


