संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसाठी विशेष उद्योग विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूर येथील उदयोन्मुख फॅशन डिझायनर कु.सीबा मोमीन यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते.
कु.सीबा मोमीन यांनी आपल्या अत्यंत प्रेरणादायी भाषणातून त्यांच्या संघर्षामय प्रवासाचा आलेख विद्यार्थिनी समोर मांडला.तसेच त्यांचे स्वतःचे डिझाईन ही विद्यार्थिनींना प्रदर्शित केले. कु. सिबा या प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून त्यांनी अनेक फॅशन शो चे आयोजन केले आहे व प्रसिद्ध अशा फॅशन क्षेत्रातील नामवंत कलाकारांसोबत काम केले आहे. पारंपरिक शिक्षण घेतल्यानंतर नोकरी अथवा व्यवसायासाठी धडपड करण्यापेक्षा शिक्षण घेत असतानाच व्यवसायिक कौशल्ये प्राप्त करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता गृहविज्ञान अभ्यासक्रमामध्ये असून या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थीनी त्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था व महाविद्यालय यांच्याकडून पोषक वातावरण निर्माण केले जात असल्याचे कु. सिबा मोमीन यांनी आवर्जून नमूद केले. यांची प्रचिती म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.प्रियंका सुरवसे या उदयोन्मुख मेकअप आर्टिस्टने सर्वसामान्यपणे मेकअप कसा करावा व त्यातून अर्थार्जनासाठी व्यवसाय कसा सुरू करावा याचेही प्रत्यक्ष मॉडेलवर सादरीकरण केले. या दोन्ही उद्योजिका विद्यार्थिनींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरल्या.
सदरील कार्यक्रमात कु.अमृता मगर व कु.वैष्णवी मोळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर कु.संस्कृती माने हिने कविता सादर केली.सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.छाया भिसे यांनी करून दिली तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. अमित घाडगे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम तृतीय वर्षाच्या रत्नाई ग्रुप यांनी इव्हेंट मॅनेजमेंटच्या प्रात्यक्षिकांतर्गत आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.नेहा गायकवाड व कु.सांस्कृती गांधी यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.किरण पवार हिने केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थिनी तसेच सर्व कर्मचारी यांचा हातभार लाभला. सदरील कार्यक्रम महाविद्यालयाच्या विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला.

