पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या कार्यक्षेत्रात प्रथमच ‘अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ हा मानाचा दर्जा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत हा दर्जा १० वर्षांच्या कालावधीसाठी (नूतनीकरणासह) प्रदान करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दि. २२ मे २०२३ च्या नियमांनुसार निर्णय घेण्यात आला आहे.
या दर्जामुळे महाविद्यालयाला संपूर्ण शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक स्वायत्तता प्राप्त होणार आहे. महाविद्यालयाला स्वतःचे अभ्यासक्रम तयार करण्याचा, नवीन पदवी, पदव्युत्तर, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा अधिकार मिळणार आहे. National Education Policy 2020 (राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०) अनुषंगाने अभ्यासक्रमात आवश्यक बदल करणेही शक्य होणार आहे.
या दर्जाचा सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे संयुक्त पदवी प्रदान करण्याची सुविधा होय. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठासोबत महाविद्यालयाचे नाव व चिन्ह (लोगो) असणार असल्याने महाविद्यालयाची स्वतंत्र ओळख अधिक बळकट होणार आहे.
विशेष म्हणजे, सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असा दर्जा मिळवणारे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय हे पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तसेच संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, उच्च विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, उच्च शिक्षण विभागाचे लेखापरीक्षक प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, मध्य विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे व शैक्षणिक कुलसचिव डॉ. आनंद शिंदे यांनीही आनंद व्यक्त केला.
याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर व प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांनी महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले आहे.
या यशामुळे महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘अधिकारप्रदत्त स्वायत्त’ हा दर्जा मिळाल्याने महाविद्यालय आता ‘लघु विद्यापीठा’च्या दिशेने वाटचाल करू लागले असून, गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित व आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

