पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्था संचलित पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभाग व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करारांतर्गत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव हे होते. या कार्यक्रमासाठी निमंत्रित कवी म्हणून सोलापूर येथील कवी साबीर वाणी या नावाने लेखन करणारे बदीउज्जमा बिराजदार, कवी कालिदास चवडेकर तसेच पंढरपूर येथील प्रसिद्ध गझलकार वैभव कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पंढरपूर शाखेचे सिद्धार्थ ढवळे, कल्याण शिंदे, अशोक माळी, जैनुद्दीन मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कवींचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला.
कविसंमेलनाची सुरुवात गझलकार वैभव कुलकर्णी यांनी श्री विठ्ठल देवतांवरील गझल गायनाने केली. विठ्ठलाशी संबंधित अनेक भावपूर्ण रचना त्यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कवी कालिदास चवडेकर यांनी प्रेम, सामाजिक आणि जीवनविषयक कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कवी साबीर यांनी सादर केलेल्या ‘आई’ या कवितेस श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी सामाजिक समता, राष्ट्रभक्ती व मानवी मूल्यांवर आधारित कविता सादर केल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांनी केलेल्या सरल, सुलभ व सुबोध संस्कृत भाषेतील भावानुवादित कुराण ग्रंथ महाविद्यालयास भेट दिला.
या कविसंमेलनात प्रा. नेहा देसाई, प्रा. स्नेहल जाधव तसेच विद्यार्थिनी स्वाती मनगिनी, ज्योती आनंद भोईटे व वैष्णवी व्यवहारे, शुभांगी वाघमारे, प्रगती लवटे, श्रावणी पवार यांनीही आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा. हरिभजन कांबळे, डॉ. बापूसाहेब घोडके, प्रा. अंकुश घुले, प्रा. मोहिनी सावंत यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कल्याण शिंदे यांनी मानले.

