सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. २४ जानेवारी) कांद्याची विक्रमी आवक झाली. तब्बल ८३६ ट्रक कांद्यांची आवक नोंदवली गेली असून, यंदाच्या हंगामातील ही आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली आहे. आवक प्रचंड वाढल्याने बाजार समिती परिसरात कांदा घेऊन आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कांदा उतरवून घेण्यासाठी वेळ लागत असल्याने लिलाव प्रक्रिया उशिराने सुरू झाली. परिणामी व्यापारी, हमाल व शेतकरी यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. दुसरीकडे, आवक जास्त आणि मागणी तुलनेने कमी असल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला असून, कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

