पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत बस थांब्यावरील हॉटेलमध्ये ग्राहकांची लूट होत असून सवलतीचे पदार्थ दर्जेदार व अधिकृत किंमतीत मिळत नाहीत. त्यामुळे अशा हॉटेलवर तातडीने करावी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाने आपल्या प्रवाशांना प्रवासात योग्य किंमतीत नाष्टा मिळावा यासाठी मार्गावरील काही हॉटेल्सना अधिकृत दर्जा देवुन तेथे चहा,पोहे, उपीट इ.पदार्थ सवलतीच्या दरात देण्याची योजना सुरू केली. त्याप्रमाणे पंढरपूर -फलटण-पुणे मार्गावरीलपणे "हॉटेल गारवा" याठिकाणी बसेस थांबतात मात्र तेथे सवलतीच्या दरातील पदार्थ मिळत नाहीत,शिवाय इतर पदार्थ अत्यंत निकृष्ठ दर्जाचे मिळतात.राईस प्लेट रु. १५०/- ला. तीही अत्यंत निकृष्ठ,बेचव अशी मिळते. याबद्दल तक्रार केल्यास मालक व कामगारांकडून प्रवाशांना अतिशय उद्धटपणे उत्तरे मिळतात,अपमानास्पद वागणूक दिली जाते.
हॉटेलमध्ये दरपत्रक नाही,स्वच्छता नाही. या हॉटेलबद्दल प्रवाशाच्या वारंवार तक्रारी येत असुनही त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे अशा हॉटेलवर तातडीने कारवाई करून तेथील थांबे बंद करावेत.आपल्या बसस्थानकावर अधिकृत उपहारगृहे चालू करावीत. यापूर्वी प्रत्येक बसस्थानकावर उपहारगृह चालू होते. तेथे स्थानिक अधिकारी लक्ष ठेवत होते,त्यामुळे दर्जा आणि सेवा चांगली मिळत होती.
तरी याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी विनंती प्रांत सहसचिव दीपक इरकल, सदस्य सुभाष सरदेशमुख,विनोद भरते,जिल्हा सचिव सुहास निकते, उपाध्यक्ष विनय उपाध्ये, पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,सचिव महेश भोसले,सहसचिव आझाद अल्लापूरकर,सागर शिंदे, सतिश निपाणकर यांनी केली आहे.


