सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला असून शिवसेनेने भाजपचा चक्रव्यूह भेदला आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या १५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शेकाप, भाजप व दीपकआबा गट यांच्या शहर विकास आघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांचा ५ हजार १४० मतांनी विजय झाला. नगराध्यक्ष पदाची निवडणूक कमळ चिन्हावर लढवण्याचा भाजपचा अट्टाहास नडला आहे.
शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती बनकर यांना ५ हजार १४० मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे. या निकालातून शेकाप भाजपच्या आघाडीला मतदारांनी साफ नाकारले असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे यांची मुलगी तनुजा एरंडे यांचा देखील धक्कादायक पराभव झाला.
सांगोला नगरपालिकेची निवडणुक सुरूवातीपासून चर्चेत राहिली होती. दरम्यान, शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती बनकर यांचा भाजप प्रवेश करून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वेगळी खेळी खेळली. शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी एकत्रित येऊन शहर विकास आघाडी स्थापन केली. तर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेकडून आनंदा माने यांना उमेदवारी दिली. प्रचारादरम्यान, एकमेकांवर टीका करताना प्रचाराची पातळी खालावली असल्याचे परिणाम निकालात दिसून आले. विशेष म्हणजे भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतल्या.
सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवून भाजपच्या नेत्यांच्या अनेक वक्तव्यांतून जाणवणारा अहंकाराचा दर्प, त्यातून बळावलेली मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती यामुळे भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मतदारांना गृहीत धरणे, अति आत्मविश्वास, लादण्यात आलेला उमेदवार, त्यातून निर्माण झालेली नाराजी, निवडणुकीत दिसून आली.

