म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
माण–खटाव विधानसभा मतदारसंघातील म्हसवड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व २१ उमेदवारांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या दणदणीत विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पूजा सचिन वीरकर तसेच विजयी २० नगरसेवकांच्या उपस्थितीत भव्य-दिव्य अशी ऐतिहासिक विजयी मिरवणूक काढण्यात आली.
या विजयी मिरवणुकीत भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू-भगिनी, तरुण तसेच आबाल-वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.
यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले की भाजपाच्या विकासाच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवत आम्हाला हा ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या म्हसवडच्या जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो व या देदीप्यमान विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा देतो.म्हसवडकरांनी दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवताना, सिद्धनाथाच्या या पवित्र भूमीला विकासाच्या बाबतीत नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा शब्द मी देतो. असे गोरे म्हणाले.
म्हसवड नगरीच्या नवनिर्वाचित पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष सौ. पूजा सचिन विरकर व सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून म्हसवड शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य यासह सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास आहे. म्हसवडच्या प्रगतीसाठी समन्वयाने व लोकाभिमुख कार्य करण्यासाठी सर्वांना गोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

