भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रस्त्यावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे वारंवार वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्याची पिराची कुरोली ते भाळवणी या रस्त्यावरून पांडुरंग, वसंतराव काळे,श्री विठ्ठल, श्री सद्गुरू,धाराशिव वाकी, ओंकार शुगर या साखर कारखान्यांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याच रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांना, लहान मुलांना,महिला, ग्रामस्थ यांना रहदारी करावी लागत आहे.
या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडताना दिसत आहे तर अनेक वेळा वाहने एकमेकांना घासत आहेत. त्यामुळे वाहनांच्या चालकांमध्ये वाद विवाद होताना दिसून येत आहे. याचाही त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
तसेच या रस्त्यावरून खडी क्रेशर साठी येणाऱ्या कच्च्या मालाची व पक्क्या मालाची ही वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी रस्त्याचा मार्ग काढून गावातून होणारी वाहतूक कमी करावी अशी ग्रामस्थांमधून मागणी केली जात आहे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.


