सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोल्यात आज शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या निकटवर्तीयांनी भाजपात प्रवेश केला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, शेकापमधील पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशासाठी मिरवणुक देखील निघाली. यावेळी एका माथेफिरुने स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारुची बाटली फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सांगोल्यातील वातावरण गरम होऊ लागले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश
आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक आणि शेकापचे नेते बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब काटकर, संभाजी आलदर, सचिन देशमुख, राणी दिघे, उल्हास धायगुडे यांच्यासह शेकडो सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा कार्यक्रम घेऊन अनेक गावातील सरपंच, माजी सरपंच, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळासाहेब एरंडे आणि शेकापचे शेकडो कार्यकर्त्यांचा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सांगोला येथे भाजपात प्रवेश झाला आहे.
सांगोल्यात तणावाचे वातावरण, उद्या सांगोला बंदची हाक
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारुची बाटली फेकल्याच्या घटनेनंतर सांगोल्यात तणावाचे वातावरण आहे. एका बाजूला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला भाई गणपतराव देशमुख यांच्या घरासमोर जमून या घटनेचा जोरदार निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी उद्या सांगोला बंदची हाक दिली आहे.
गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा : पालकमंत्री जयकुमार गोरे
भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा असल्याचे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने यात आरोपीस पकडून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. कोणाच्याही घरावर हल्ला झाला तर तो खपवून घेता जाणार नसल्याचे मत जयकुमारे गोरे यांनी व्यक्त केले आहे. भाई गणपतराव देशमुख आमच्यासाठी पूजनीया असल्याचेही जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.