पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त जसजसा जवळ येतो आहे, तसतशी ग्राहकांमध्ये सोनं आणि चांदी खरेदीसाठी उत्सुकता वाढत जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. सोनं 135000 रुपये प्रति तोळा दरापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती. मात्र, आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झालं आहे.
सोन्याच्या दरात 3000 रुपयांची घसरण, चांदी झाली 8000 रुपये स्वस्त
जळगावच्या मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1,32,000 वर आले आहेत. तर चांदीच्या दरात आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर 1,78,000 रुपयांवरून 1,70,000 रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
सोने-चांदीच्या दरात आणखी तेजी येणार ?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तेजी आल्याचं पाहायला मिळालं. जगभरातील विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडून सातत्यानं करण्यात येत असलेली सोने खरेदी, भू-राजनैतिक तणाव आणि आशियातील मोठी मागणी यामुळं विदेशी बाजारात सोन्याच्या दरात तेजी राहू शकते. सोन्याचे दर प्रति औंस 4500 डॉलर पर्यंत पोहोचू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या रिपोर्टनुसार या वर्षात आतापर्यंत परताव्याच्या बाबतीत सोन्याला चांदीनं मागं टाकलं आहे. चांदीचे दर औद्योगिक क्षेत्रातील मजबूत मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळं 75 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात.
सोन्याचे दर 2025 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढले असून 4000 अमेरिकन डॉलर्सच्या वर पोहोचले आहेत. सोन्याचे दर यंदा 35 वेळा या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत. जागतिक अस्थिरता, या वर्षाच्या शेवटी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून करण्यात येणारी व्याज दरातील कपात आणि केंद्रीय बँकांकडून सोन्याचा साठा वाढवला जात असल्यानं दरात वाढ झाली आहे.
रिपोर्टनुसार भारतात सोन्याचे दर गेल्या आठवड्यात एका तोळ्याचे दर 1 लाख 20 हजारांच्या दरम्यान होते. तर, येत्या काळात सोन्याचे दर 1.35 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. तर, चांदीचे दर वर्षभरात 60 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. चांदीचे दर 2 लाख 30 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.