पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स–विद्यार्थी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने “ट्रान्समिशन लाईन व स्थिर चुंबकीय क्षेत्र” या तांत्रिक विषयावर तज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या व्याख्यानाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विद्युत अभियांत्रिकीतील मूलभूत व व्यावहारिक संकल्पना समजावून देणे हे होते.
या व्याख्यानासाठी सौ. अस्मिता ए. सनगर (न्यूजेन सॉफ्टटेक, पुणे) यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना या विषयांवर सखोल व तांत्रिक माहिती दिली. त्यांनी ट्रान्समिशन लाईन व स्थिर चुंबकीय क्षेत्र यांचे उद्योगांतील उपयोग, नवनवीन संशोधन आणि आव्हाने यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ट्रान्समिशन लाईन ही एक विद्युत ऊर्जा वाहून नेणारी प्रणाली आहे, जी वीज केंद्रातून वीज वापराच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वापरली जाते. ही वाहिनी उच्च दाबाची वीज दूर अंतरावर पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. ट्रान्समिशन लाईनचे प्रकार, त्यातील ऊर्जा हानी, प्रतिरोध , प्रक्षेपण क्षमता आणि प्रतिध्वनी यांसारख्या संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना या व्याख्यानात देण्यात आली. तसेच स्थिर चुंबकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जे समयाच्या दृष्टीने अपरिवर्तित असते. उदाहरणार्थ, चुंबकाजवळ तयार होणारे क्षेत्र हे स्थिर असते, जर त्यात वेळेनुसार कोणताही बदल होत नसेल. या क्षेत्राचा उपयोग ट्रान्सफॉर्मर, मोटर, जनरेटर यांसारख्या विद्युत उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. व्याख्यानात यामध्ये चुंबकीय फ्लक्स, गाउसचे नियम, अॅंपियरचा नियम, आणि यांचा व्यावहारिक उपयोग स्पष्ट करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. पी. बी. व्यवहारे व प्रा. एम. आर. खडतरे यांनी केले. यावेळी डॉ. के. शिवशंकर (विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी व इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स–विद्यार्थी शाखा सल्लागार), डॉ. स्वानंद कुलकर्णी (इन्स्टिटयूट ऑफ इनोव्हेशन कौन्सीलचे अध्यक्ष व उपप्राचार्य), तसेच डॉ. कैलाश करांडे (प्राचार्य व इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स–विद्यार्थी शाखा मार्गदर्शक) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या व्याख्यानात तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी ऊर्जा प्रणालीतील अद्ययावत ट्रान्समिशन तंत्रज्ञान, स्थिर चुंबकीय क्षेत्राची शास्त्रीय भूमिका व त्याचा औद्योगिक उपयोग यासंबंधी माहिती मिळवली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

