भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
त्याग आणि समर्पण हा रयत शिक्षण संस्थेचा पाया आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असणारा शिक्षक हाच शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण सुरू असताना संख्यात्मकदृष्टया निर्माण झालेल्या शिक्षण व्यवस्थेत कोणतेच अप्रूप नाही. १०७ वर्षापूर्वी अतिशय कठीण परिस्थिती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.असे विचार माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138 वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी सचिव डॉ जे.जी.जाधव हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे उपस्थित होते.
याप्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन संभाजी राजे शिंदे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य वामनभाऊ सराटे पाटील, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवानराव चौगुले, सरपंच रणजीत जाधव ,उपसरपंच नितीन शिंदे, माजी मुख्याध्यापक भीमराव जाधव, डॉक्टर राजेंद्र लाले, सचिन शिंदे, सिताराम माने, पालक वर्ग विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो - कलाशिक्षक तुकाराम खरात व विद्यार्थ्यांनी बनवलेली आकर्षक कलाकृती
यावेळी बोलताना इंद्रजीत देशमुख म्हणाले की, कर्मवीर अण्णांनी ज्या विचारावर ही संस्था उभी केली आहे त्या विचाराचे आपण सर्वजण पाईक होऊया.मोबाईल पासून दूर रहा आईवडिलांची स्वप्ने साकार करा अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.काळाची गरज ओळखून जात, धर्म, भेदभाव यांच्या पलीकडे जावून शिक्षण व्यवस्थेत नव-नवीन प्रयोग करून विद्यार्थी घडवावेत. कर्मवीर अण्णांनी दिलेल्या आदर्शतून रयतची वाटचाल चालू आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी माजी विद्यार्थी संघ भाळवणी यांच्या वतीने ग्रंथालयासाठी 75 पुस्तके भेट देण्यात आली.
प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य के डी शिंदे यांनी केले यांनी केले. पुरस्कार वितरणाचे निवेदन उपशिक्षक संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन माधवी भोसले व लिंगे मॅडम व भारत विधाते यांनी केले. या कार्यक्रमास माजी रयत सेवक, सेवक विविध शाखांचे शाखाप्रमुख, विविध समित्यांचे सदस्य, शिक्षक,पालक,विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली.
पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी प्रथमच ग्रामपंचायतचे सरपंच रणजीत जाधव यांच्या वतीने हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना कांदा पोह्याचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच जाधव यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.



