अनवली प्रतिनिधी तेज न्यूज
अनवली येथील सतू कृष्णा केणी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138 व्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य सुनेत्राताई पवार होत्या व या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. तुकाराम मस्के होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून प्रा. तुकाराम मस्के म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्था आजही वंचित व दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीरांनी लावलेले छोटेसे रोपटे आज एक विशाल वटवृक्ष झाले आहे. संस्थेच्या सर्व शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बदलत्या काळाबरोबर बदलत्या माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून आज संस्था सर्व शाळांमध्ये संगणकीय शिक्षण, इंट्रॅक्टिव्ह पॅनल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या माध्यमातून शिक्षण देत आहे. अशा अनेक उपक्रमांमुळे संस्था प्रगतिपथावर आहे. त्याचबरोबर अण्णांनी ग्रामीण भागात उपेक्षित, वंचित घटकांच्या शिक्षणासाठी सुरू केलेले वस्तीगृहाचे प्रयोग आजही प्रेरणादायी आहेत. जाती-धर्मभेद न मानता वस्तीगृहातील मुले एकत्र राहून शिक्षण घेत होती.
प्रा. तुकाराम मस्के यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना उद्देशून व पालकांना संबोधित करत मोबाईल, विद्यार्थी व पालक या त्रीशंकूचे सध्या होत असलेले असंतुलन स्पष्ट करत आपल्या पाल्यांच्या इच्छा व त्यांच्या गरजा ओळखून त्यांचा मित्र होऊन आपण त्यांच्या भविष्यासाठी अनुकूल व आदर्श पालक कसे व्हावे याबद्दल अचूक असे मार्गदर्शन केले. त्यांचे मानसिक आरोग्य जपताना आपण त्यांचे रोल मॉडेल कसे व्हावे व आपल्या पाल्याचे दुसऱ्या विद्यार्थ्यांशी तुलना करणे याबाबत पालकांना उपदेश करण्यात आला. कार्यक्रमावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विद्यालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व, निबंध लेखन व रांगोळी स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शालेय क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरावर उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, अनवली गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य लोकरे यू. एम. यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणावर एल एम यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी लेंडवे ए. बी. यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनी यशस्वी नियोजन व सहकार्य केले.

