धोंडेवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथे रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज अंतर्गत कृषीदूत कार्यक्रमाच्या माध्यमातून उसाच्या सेट्सवर बविस्टिन बुरशीनाशक बियाणे प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडले. या प्रात्यक्षिकाचे आयोजन उस उत्पादनात वाढ आणि रोग नियंत्रणाचा उद्देश ठेवून करण्यात आले होते.
बविस्टिन या बुरशीनाशकाचा वापर करून उसाच्या सेट्सवरील बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळवता येते. बियाणे प्रक्रिया करताना 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम बविस्टिन मिसळून उसाचे सेट्स 10 ते 15 मिनिटे त्या द्रावणात बुडवून ठेवण्यात आले. ही प्रक्रिया करून सेट्स सावलीत वाळवून लागवड करण्याची शिफारस करण्यात आली.
या प्रात्यक्षिकात रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत क्षिरसागर मंगेश, डोंगरे रामहरी, खरात रोहन, खटके रणजित, माळी शंतनु, राऊत चैतन्य आणि शिंदे अविष्कार यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी या प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले आणि आपल्या शेतातही ही पद्धत अवलंबण्याचा निर्धार व्यक्त केला. बविस्टिनद्वारे केलेली बियाणे प्रक्रिया उसाचे उगम प्रमाण सुधारते, सेट्सवरील डोळे कुजण्याची शक्यता कमी करते आणि एकसंध, रोगमुक्त उगमास मदत करते. त्यामुळे उसाचे एकंदर उत्पादन वाढण्यास मदत होते. या प्रात्यक्षिकातून गावातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असून भविष्यात या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे तसेच प्रा. एस.एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम .एम . चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) विषयतज्ञ प्रा. डी . एस.ठवरे यांचे मार्गदर्शन लाभले.