पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) साठी ही गौरवाची बाब आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. दिग्विजय दादासाहेब रोंगे यांची अॅश्रे पुणे चॅप्टरच्या सोसायटी वर्ष २०२५-२६ करीता बोर्ड ऑफ गव्हर्नर्स (बीओजी) चे सदस्य म्हणून निवड झाली असून विद्यार्थी उपक्रम समन्वयक (स्टुडंट अॅक्टीव्हीटी चेअर) या पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
अॅश्रे तथा अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रीजरटींग अँड एअर कंडीशनींग इंजिनिअर्स ही जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त संस्था असून, ही संस्था शाश्वत इमारत डिझाईन, उभारणी आणि एचव्हीएसी प्रणालींच्या कार्यक्षम कार्यान्वयनासाठी महत्त्वपूर्ण संसाधने पुरवते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मधील अॅश्रे विद्यार्थी शाखेची स्थापना २६ मार्च २०१९ रोजी झाली होती. यंदा या शाखेला ६ वर्षे पूर्ण झाली असून सध्या १८ विद्यार्थी सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
विद्यार्थी प्रतिनिधी मंडळात अध्यक्ष म्हणून नेहा सुर्यवंशी, उपाध्यक्ष म्हणून आशुतोष जाधव, खजिनदारपदी गायत्री गायकवाड तर सचिव पदाचा भार अल्फिया इनामदार या सांभाळत आहेत तसेच या शाखेने अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले असून विशेष करून २०२२ मध्ये ‘सोलार पॉवर्ड कोल्ड रूम युजिंग फेज चेंज मटेरियल्स’ या प्रकल्पासाठी अॅश्रे कडून तीन हजार पौंड अनुदान प्राप्त झाले आहे तसेच अॅश्रे मधील विद्यार्थ्यांनी अॅश्रे आयोजित औद्योगिक भेटी व कार्यशाळा, स्थानिक शाळांमध्ये एसटीइएम जनजागृती उपक्रम तसेच तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद व मार्गदर्शन या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या या योगदानाची अॅश्रे पुणे चॅप्टर कडून प्रशंसा करण्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर डॉ. दिग्विजय रोंगे यांची विद्यार्थी उपक्रम समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते पुणे चॅप्टरच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी शाखांच्या उपक्रमांचे समन्वयन करतील.
या निवडीमुळे संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्रा. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले आहे.