डॉ.रोंगे सरांच्या नेतृत्वात शिवसंस्कार डोकावतात . इतिहासकार डॉ.शिवरत्न शेटे
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘डॉ. रोंगे सरांना भूतकाळाची जाणीव आहे. मी कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या निमित्ताने देशभर फिरलो, परंतु लहान लहान गोष्टींमधलं नियोजन, त्या नियोजनाची जबाबदारीने केलेली अंमलबजावणी, आपल्या भूतकाळात सहकाऱ्यांनी आपल्याला केलेल्या मदतीची जाणीव ठेवणे अशा अनेक गोष्टींमधून डॉ. रोंगे सरांच्या नेतृत्वात शिवसंस्कार डोकावतो. शिक्षणक्षेत्रात एवढे यश मिळूनही डॉ. रोंगे सरांनी स्वेरी उभी करण्यात योगदान देणाऱ्या सर्व मंडळींची आवर्जून नावे घेतली, ही अभिमानाची बाब असून त्यांच्या यशाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. शिरपेचावर यशाचा मुकुट असताना पायाखालच्या दगडांची जाणीव ठेवणारा माणूस मला इथे पाहता आला.’ असे प्रतिपादन हिंदवी परिवाराचे संस्थापक, शिवसह्याद्री आरोग्य धामचे प्रमुख, इतिहासकार डॉ.शिवरत्न शेटे यांनी केले.
स्वेरीच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.शिवरत्न शेटे हे शिवविचार, भीमविचार, नातेसंबंध, विद्यार्थी जीवन, स्वेरीची वाटचाल, आरोग्य आणि डॉ. रोंगे सरांचे शैक्षणिक योगदान या विषयांवर प्रकाश टाकत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे माजी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आबासाहेब डख हे होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून स्वेरीच्या २७ वर्षांच्या यशस्वी वाटचालीची रूपरेषा सांगितली. त्यांनी आपल्या भाषणातून पंढरपूरचे माजी आमदार स्व.सुधाकरपंत परिचारक, तत्कालीन शिक्षणमंत्री दत्ताजीराव राणे, पंढरपूर अर्बन बँकेचे कै. देविदास भिंगे, कै. श्रीपाद थिटे, प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. एन. बी. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै. डॉ. द.ना.धनागरे, डॉ. रामगौडा, ह.भ.प. तनपुरे महाराज, तसेच स्वेरी साठी योगदान देणाऱ्या व मदत केलेल्या मान्यवरांची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे डॉ. शेटे यांनी शिवसंस्कार, आणि आपले जीवन याबाबतचे चिंतन अभ्यासपूर्ण रीतीने सर्वांसमोर मांडले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी इतिहास जाणून घेत होते. डॉ. शिवरत्न शेटे यांनी महाराष्ट्राची ताकद काय आहे हे सांगताना शूर वीर मराठे, रणधुरंधर सेनानी, संत, समाज सुधारक, यांच्या कार्याचा गौरव केला. स्वेरी गीताचे कौतुक करताना ते म्हणाले की, ‘मी अनेक ठिकाणी गेलो परंतु संस्थेचे गीत असलेले हे एकमेव कॉलेज आहे. त्यामुळे स्वेरी गीताचे प्रचंड कौतुक आहे. हा विद्यार्थ्यांवर डॉ. रोंगे सरांनी घडविलेल्या संस्काराचा एक भाग आहे कारण विद्यापीठाच्या परीक्षेत कसेही पास होता येते पण आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी संस्कारांची शिदोरी जवळ बाळगावी लागते.’ असे सांगून भविष्यात शिवजयंती व भीमजयंती मधील मिरवणुका ह्या डीजे मुक्त असाव्यात. असे सांगताना ‘वाद्याला विरोध नाही पण डीजे नसावा अशी मागणी सर्वांकडून व्हावी.’ असे ही आवाहन केले. आई-वडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ नका असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना भावनिक साद देखील घातली. एकूणच डॉ.शिवरत्न शेटे यांनी आपल्या व्याख्यानातून सर्व विषयांना स्पर्श केला. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. डख म्हणाले ‘सर्वप्रथम मी डॉ. रोंगे सरांच्या नावानेच भारावून गेलो असून त्यांचे शिक्षणातील योगदान, कार्य करण्याची पद्धती याचा मला सार्थ अभिमान वाटतो. डॉ. रोंगे सर हे शिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत. सरांच्या कार्याला सलाम! मी जरी जनावरांचा डॉक्टर असलो तरी मला डॉ. रोंगे सरांनी बोलतं केलं. स्वेरीच्या कार्याचा, यशाचा उंच डोलारा असाच वाढत राहो.’ असे सांगून त्यांनी वर्धापन दिनासाठी शुभेच्छा दिल्या. सायंकाळी लहू ढगे व राम पवार यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची रंगत वाढली तर रात्री स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्वेरीची मुख्य इमारत, फार्मसी इमारत व नवीन इमारतीवर विविध रंगांच्या लाईट माळांच्या रोषणाईने आकर्षकता वाढवली होती.
या कार्यक्रमाला गोपाळपूरचे सरपंच प्रतिनिधी अरुण बनसोडे, पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष अरविंद जाधव, विठ्ठल प्रशालेचे माजी प्राचार्य डॉ.आर. डी. पवार, श्री. नरसाळे सर, डॉ. पडवळ सर, शिवाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे बार्शीचे प्राचार्य डॉ. सुब्राव गोरे, संभाजी शिंदे, पोपट पाटील, अशोक पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, पंढरपूरच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे, पालक संघाचे आबासाहेब दैठणकर, मार्गदर्शक डॉ.विश्वासराव मोरे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी अध्यक्ष व विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच एम बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे, आर.पी.आय.चे सागर गायकवाड, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.