पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम जलद गतीने करुन 1 मार्ग 4 दिवसांत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळास दिले. अशी माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गाचे कॉंक्रिटिकरण करण्यासाठी सदर मार्ग २० दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाने पंढरपूरचे तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, शहर पोलीस स्टेशन इ.विभागांना कळविण्यात आले.
त्याप्रमाणे संबंधित यंत्रणांनी त्या मार्गावर दैनंदिन नागरिकांचा संपर्क असलेली महत्त्वाची शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था इ. असल्याने पालक,विद्यार्थी, नागरिक यांची सातत्याने वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे विभागास एकेरी वाहतूक सुरू ठेवुन काम करावे असे लेखी कळविणे आवश्यक होते परंतु कोणत्याही शासकीय यंत्रणेने जनतेच्या अडचणीबाबत विचार केला नाही. रेल्वे विभागास पत्रव्यवहार केला नाही. संपर्क केला नाही, त्यामुळे रेल्वे विभागाने संपूर्ण मार्ग बंद करून काम सुरू केले.
रेल्वे विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सोलापूर व पंढरपूर रेल्वे विभागाशी फोनवरून संपर्क केला तसेच पत्राद्वारे विद्यार्थी,पालक,नागरिक,भाविक यांची अडचण गांभीर्याने मांडली, पर्यायी मार्ग किती लांबचा आहे त्यांच्या निदर्शनास आणून दिले, त्याचबरोबर रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क केला व कामाच्या ठिकाणी समक्ष चर्चा केली.त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून हे काम जलद गतीने करून एक मार्ग चार दिवसांत पादचारी,दुचाकी,तीन चाकी अशा छोट्या वाहनांसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे रविवारी किमान छोटी वाहने, पादचारी यांना तेथून ये जा करता येईल.
या समक्ष चर्चेत रेल्वेचे सहा.अभियंता अंकित सिंग, सहकारी महादेव भणगे, गिरी, ग्राहक पंचायतीतर्फे सोलापूर विभाग रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विनोद भरते, प्रांत सहसचिव दीपक इरकल, जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव सुहास निकते, सदस्य रामदास गव्हाणे,विभाकर पंचवाडकर, इ. सहभागी झाले होते.