पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई या संस्थेतील तथाकथित कारभाराबाबत तक्रार केल्यानंतर सहकार आयुक्तांनी कलम 83 प्रमाणे चौकशीचे आदेश दिले. परंतु तीन महिने उलटले तरी अद्याप अहवाल देण्यास टाळाटाळ केली जाते आहे. चौकशी अधिकार्यांवर दबाव असल्यामुळे अधिकारी बदलून निरपेक्षपणे चौकशी करण्याची मागणी माहिती माजी संचालक आणि मूळचे शेगाव (ता. जत) येथील अॅड. अशोक शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
अॅड शिंदे म्हणाले, संस्थेच्या जागृत सभासदांनी वार्षिक सभेत लेखी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिले जात नाही. मनमानी कारभार सुरू आहे. सभासदांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. संस्थेच्या 103 शाखा आहे. सांगली जिल्ह्यात नऊ शाखा आहेत. भरती, बढती व बदल्यांच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे. सहा महिन्यात सांगली-कोल्हापूर परिसरातील 150 कर्मचार्यांना काढून टाकले. वाहन खरेदी, मंदिर देणग्यातून उधळपट्टी सुरूच आहे. पतपेढीला राजकीय अड्डा बनवले आहे. त्यामुळे माझ्यासह सभासद संदीप खामकर, बाळासाहेब डोळस, सतीश गावडे, काशीराम सावर्डेकर यांनी सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली होती.
अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी 17 मार्च 2025 रोजी कलम 83 नुसार चौकशीचे आदेश दिले. उपनिबंधक राम कुलकर्णी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. चौकशी अधिकारी दबावाखाली काम करीत आहेत. तीन महिने उलटले तरी दबावामुळे अहवाल दिला नाही. त्यामुळे चौकशी अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना देखील भेटून पतसंस्थेच्या चौकशीबाबत तक्रार केली आहे.
पतपेढीचे ठेवीदार, सभासद यांच्या हितासाठी तसेच त्यांचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आवश्यक आहे. अन्यथा संचालक एकाधिकारशाही राबवून संस्था गिळंकृत करतील. त्यामुळे संस्थेच्या अनियमित कारभाराची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अॅड शिंदे यांनी दिला.