करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
संत सावता महाराज श्री संत नामदेव महाराज आणि श्री सद्गुरू बजरंग तात्या महाराज पिसे या सकलसंत पुण्यस्मरणा निमित्ताने ह.भ.प.सुदाम महाराज यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम समाजप्रबोधनकार आदरणीय निवृत्ती महाराज इंदुरीकर सांगत होते.
सुरुवातीला काकड्याच्या पाठातील संत तुकाराम महाराज यांचा हा सुंदर अभंग निरुपणासाठी घेत तुकाराम गाथा हा मनुष्याच्या जीवनातील पाचवा वेद आहे.आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर त्यांनी कोवळ्या वयातच जगाची माऊली सकलांचा आधार होऊन सकल जणांचा उध्दार केला.त्यासाठी त्यांना त्यांचे थोरले बंधू श्री संत निवृत्तीनाथ यांचा बोध झाला.चित्त स्थिर झाल्याशिवाय परमार्थ घडत नाही.आणि ते स्थिर होण्यासाठी अध्यात्माची कास धरा.आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर भजन करा,नितीने वागा, आईवडीलांची सेवा करा,आणि शरीर सुदृढ ठेवा तरच परमार्थ घडेल.जगाला सुखी आणि सन्मार्गाला लावण्याची ताकत कीर्तनामध्ये आहे.जीवन जगत असताना स्वाभिमान गहाण टाकून जगू नका.कारण पैसा सत्ता आणि गुंडशाहीने तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात विजय मिळवू शकाल परंतु काळावर, मृत्यूवर आणि निसर्गावर कधीच विजय मिळवू शकणार नाही.ते फक्त सावळे परब्रह्मच आहे जो सर्व गोष्टींवर विजय मिळवू शकतो..आपल्यात असणारा मीपणा,माया,लोभ, अहंकार,मंद,मत्सर,द्वेष, इच्छा, कल्पना,यांचा त्याग करत फक्त आणि फक्त चांगलं कर्म करत रहा.सांगत भारुडातून वरअंगी मनोरंजन असलतरी अंतरंगी अध्यात्माचा गाभा ओतप्रोत भरला आहे.अतिशय सुंदर दृष्टांत विनोदी दाखले देत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी करकंब आणि करकंब पंचक्रोशीतील भक्त प्रचंड संख्येने उपस्थित होते.त्यांना साथसंगत पांडुरंग लाजुरकर महाराज ,कृष्णा महाराज,बळीराम महाराज, श्रीहरी महाराज, हनुमंत महाराज, लक्ष्मण कवडे संतोष कवडे राम अनवते,शुभम महाराज.यांनी साथ करत कीर्तनाला अधिक रंग भरला.
आज या सप्ताहाची सांगता होणार असून विशाल महाराज खोले यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि दहीहंडीने,आणि पालखी मिरवणूकीने आणि कनकंबा एक्स्प्रेस च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येणाऱ्या अंकाचे प्रकाशन होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे.हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी श्री सिध्दनाथ मंदिर ट्रस्ट आणि सद्गुरू बजरंग तात्या महाराज शिष्य परिवार यांनी अधिक परिश्रम घेत सप्ताह यशस्वी केला.