पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शोध परिषदेमध्ये (ICSICME 2025) सस्टेनेबल इनोव्हेशन इन सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनियरिंग या विषयावर आधारित "स्टार्टअप आणि इनोव्हेशन" या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर पॅनेल डिस्कशन पार पडले. कॉन्फरन्स डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे परिसंवाद सत्र यशस्वीरित्या पार पडले.
या चर्चासत्रात स्टार्टअप इकोसिस्टममधील अडथळे, संधी, धोरणात्मक उपाययोजना, तसेच शैक्षणिक संस्था, संशोधक, उद्योजक आणि सरकारी यंत्रणा यांची भूमिका यावर सखोल चर्चा झाली. परिसंवादात सहभागी मान्यवरांनी नवउद्योजकांना योग्य प्रोत्साहन आणि मदतीची गरज अधोरेखित केली.
कौशल्याधारित शिक्षण, संशोधन आणि उद्योग यामधील समन्वय, तसेच स्थानिक गरजांनुसार सशक्त स्टार्टअप इकोसिस्टम उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. स्टार्टअप्ससाठी निधी उभारणीच्या अडचणी, धोरणांची अंमलबजावणी, डिजिटल व भौतिक पायाभूत सुविधांची गरज, अशा अनेक मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले.
चर्चासत्रात खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला:
शालेय व महाविद्यालयीन पातळीवर नवोन्मेषाचे शिक्षण व प्रोत्साहन, स्थानिक गरजांशी सुसंगत स्टार्टअप मॉडेल्स, खाजगी भागीदारीतून निधी उभारणीसाठी प्रभावी चॅनेल्स, नवउद्योजकांसाठी सुलभ मार्गदर्शन व मेंटॉरिंग, ग्रामीण आणि शेती क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्ससाठी विशेष धोरण, प्रादेशिक गरजांशी सुसंगत संशोधनाधारित स्टार्टअप्सना प्रोत्साहन.
या परिसंवादातून असे निष्पन्न झाले की, तरुणांमध्ये स्टार्टअप्सबाबत प्रचंड जिज्ञासा असून, योग्य मार्गदर्शन आणि धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास अनेक नवकल्पनांचे यशस्वी उद्योजकतेमध्ये रूपांतर होऊ शकते. सरकार, शिक्षण संस्था आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याची गरज पॅनेल सदस्यांनी नमूद केली.
या परिसंवादात तारापाका विद्यापीठ (चिली) येथील डॉ. अतुल सागडे, ग्राफिक इरा विद्यापीठ (डेहराडून) येथील डॉ. अमित श्रीवास्तव, ज्योती इन्स्टिट्यूट (बेंगळुरू) येथील डॉ. श्रीकेशवा के. एस., तसेच डॉ. आर. प्रभाकरा हे संशोधक तज्ज्ञ पॅनेल सदस्य म्हणून सहभागी झाले होते.परिसंवादाचे समन्वय डॉ. श्रीगणेश कदम आणि डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी केले.
या चर्चासत्रात देश-विदेशातील विविध प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी स्टार्टअप व इनोव्हेशनसंदर्भातील शंका व अडचणींवर उपस्थित तज्ज्ञांशी थेट संवाद साधत परिसंवाद अधिक फलदायी केला. कॉन्फरन्स चेअर डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख तसेच कॉन्फरन्स सेक्रेटरी डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. श्याम कुलकर्णी, परिषद समन्वयक डॉ. सत्यवान जगदाळे, डॉ. सोमनाथ कोळी, प्रा. ओमकार बिडकर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.