संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने विशेष लेख
भक्तिमहात्म्यातून राष्ट्रकार्य करणारे संत नामदेव महाराज
संत ज्ञानदेवादि भावंडे जेव्हा तीर्थयात्रेला निघाली, त्यावेळी त्यांनी आपल्याबरोबर संत नामदेवांना तीर्थयात्रेला येण्याचा आग्रह धरला. परमात्मा पांडुरंगाची अनुमती घेऊन संत नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा नामदेवांबरोबर तीर्थयात्रा करण्याचा मुळातच हेतू *भूतळींचीं तीर्थे पहावी नयनीl असे आर्त मनी विष्णुदासाll* हा होता. भारतखंडातील निरनिराळ्या प्रांतातील तीर्थक्षेत्रे पहावीत, येथील धार्मिक कृत्ये जाणून घ्यावीत हाच या यात्रेचा हेतू होता. या हेतू प्रमाणे या संतांची मांदियाळी ज्या-ज्या गावी जात, तेथे-तेथे भजन, कीर्तन, सत्संगाचे कार्यक्रम होत. लोकांचे प्रबोधन केले जात. संत नामदेवरायांच्या भाषेत सांगायचे झाले तर, *नाचू कीर्तनाचे रंगीI ज्ञानदीप लावू जगीII* याप्रमाणे विशेषतः उत्तर भारतामध्ये परकीय मुसलमान आक्रमकांच्या कारवायांनी त्रस्त होऊन अंधकारमय जीवन जगणाऱ्या जनांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकमनाची नाडी जाणणाऱ्या संत नामदेव महाराजांनी याप्रसंगी केलेल्या सहज प्रबोधनातून अनेक गोष्टी जनसामान्यांना त्यांच्या भाषेत सांगितल्या. खरा भक्त सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळा असतो. रजोगुण व तमोगुण यांची त्याला बाधा होत नाही, तो सत्वसंपन्न असतो, परमेश्वराचे प्रेम जिच्यामुळे लाभते तिलाच *भक्ती* म्हणावे. अशा पद्धतीने या तीर्थयात्रेचा उपयोग करीत संत नामदेवांनी संपूर्ण भारतभर आपल्या कीर्तन-भजनातून प्रबोधन करण्याचे मोठे कार्य केले.
संत नामदेव महाराज संपूर्ण तीर्थयात्रेमध्ये शके १२१२ ते १२१८ या सहा वर्षांच्या कालखंडात ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिसळून भक्तिमार्गाचा प्रभावीरीत्या प्रसार करत होते, हे पाहून ज्ञानेश्वर महाराजांना असे वाटत होते, की उत्तर भारतामध्ये परकीय आक्रमकांमुळे देव, देश, धर्म व संस्कृतीला जो धोका निर्माण झाला आहे, तो दूर करण्याकामी नामदेव महाराजांच्या भक्तीचळवळीची तेथे गरज आहे. त्यामुळे नामदेव महाराजांनी आणखी काही काळ उत्तर भारतात राहून कार्य करावे असे वाटत होते. पण ज्ञानदेवांबरोबरचे नामदेवांचे सख्यत्व एवढे दृढ झाले होते, की आता नामदेव ज्ञानदेवांना सोडून जाणे शक्यच नव्हते, या सार्यांची जाणीव झाल्यानंतर ज्ञानदेवांनी कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८ मध्ये समाधी घेण्याचाच निर्णय घेतला. अनेकांनी विनवून देखील नामदेवांना ईप्सित कार्यासाठी पाठविण्याच्या ध्येयासाठी ज्ञानदेवांनी आपला समाधी घेण्याचा निर्णय बदलला नाही. स्वतः नामदेवराव ज्ञानदेव व त्यांच्या भावंडांच्या समाधी घेण्याच्या प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाबरोबर या साऱ्या प्रसंगी यजमान होऊन हा समाधीचा सोहळा पार काढण्यासाठी सर्वतोपरी कार्य केले व त्यानंतर लगेचच शके १२२० मध्ये ते एकटेच उत्तर भारताच्या तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले व धर्म जागृतीच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
श्री.ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यावर श्री.नामदेवांना इकडे राहवेना. ज्ञानदेवांबरोबर केलेल्या तीर्थयात्रेच्या कालात, त्यांच्याशी वारंवार केलेल्या सुखसंवादात त्यांना पंढरीनाथ सर्वत्र भरला असल्याची त्यांची प्रचिती दृढ झाली. *इभै विठ्ठल उभै विठ्ठल, विठ्ठल बिन संसार नहीI* विठ्ठल येथे
आहे, तेथेही आहे. विठ्ठलावाचून जगात दुसरे काही नाही, अशी
त्यांच्याच हिंदीमधील वचनाप्रमाणे त्यांना प्रचिती आली होती. *हिंदू पुजै देहूरा मुसलमान मशीतl नामा सोई सेविया जह देहूरा ना मशीतll* हिंदू देवालयात व मुसलमान मशिदीत देवाची पूजा व प्रार्थना करतात, पण जो देव देवळात व मशिदीतही सापडत नाही, त्या देवाची पूजा करावी. त्यांना सर्वत्र परमेश्वर दिसत होता. शके १२२० मध्ये नामदेवराय एकटेच उत्तर भारताच्या तीर्थयात्रेला निघाले. ते प्रथम ओंकार, मांधाता, द्वादश वैवर्तक, प्रभास, सोरटी सोमनाथ व कुरुक्षेत्री गेले, त्यानंतर ते स्थानेश्वर व इंद्रप्रस्थाहून हस्तिनापुराला आले. यात मुख्यतः गुजरात, काठेवाड व पंजाबातील ठिकाणी मुसलमानांनी आक्रमण करून उध्वस्त केलेल्या भागाची परिस्थिती त्यांच्या दृष्टीस पडली. नंतर हरिद्वार, ऋषिकेश वगैरे करून ते गंडकी तीराकडे गेले. मग अयोध्या, मधुपुरी व नैमिषारण्यातून वृंदावनात आले. त्यानंतर माळवा, संयुक्त प्रांत हिंडून पंजाबमधील पश्चिमेकडील धोमान या गावात आपले मुख्य केंद्र स्थापिले व तेथे ते सुमारे वीस वर्षे राहिले. तो भाग म्हणजे जेथून हल्ल्यासाठी परकीय लोक भारतात घुसतात असा पश्चिम दरवाजा होय. तेथे श्री नामदेवांनी आपला तळ ठोकला. श्री नामदेवांच्या उत्तरेकडील प्रचाराचे धोमान हे अधिकृत व मुख्य केंद्र होय. तेथे त्यांनी उभारलेले प्रमुख मंदिर असून त्यात राधाकृष्ण व शंकर या दैवतांची त्यांनी स्थापना केली. *नामा म्हणे शिव, विष्णू एकरूप ताराया अमूष (अनेक) अवतारI* सर्वत्र एकच देव भरला आहे, त्यांची अनेक नावे आहेत. कोणीही कोणत्याही नावाने त्याचे भजन करावे.
परकीय आक्रमकांनी त्रस्त व हैराण झालेली उत्तरेकडील जनता त्यांच्या बिकट परिस्थितीतून वाट दाखविणारा उद्धारकर्ता कोणी भेटेल का याची वाट पहात होती, तो त्यांना दक्षिणेतील श्री नामदेव रूपाने मिळाला. श्री नामदेवांनी त्यांच्यामध्ये वीस वर्षे वास्तव्य करून त्या भागात सर्वत्र संचार केला व त्यांच्या भाषेतून त्यांना भक्तीज्ञानाची व समतेची शिकवण दिली व धर्मजागृती केली. त्यांची धर्मावरील निष्ठा अढळ करुन, परकीय आक्रमणाने न भेदरता त्यास तोंड देण्याची खंबीर वृत्ती त्यांच्यात निर्माण केली. धोमान, अमृतसर, लाहोर, गुरुदासपूर, जालंदर, लुधियाना, अंबाला वगैरे ठिकाणी श्री नामदेवांनी स्थापन केलेली मंदिरे पंजाबात आहेत. तसेच राजपुतान्यात जयपूर, जोधपूर, भरतपूर व बिकानेर - अलवार या ठिकाणीही त्यांनी मंदिरे उभारली. याशिवाय अनेक खेडोपाडी संचार करून परकीय आक्रमणाने उध्वस्त केलेल्या भागात त्यांनी भक्तीचा प्रचार करून हवालदिल झालेल्या जनतेत ऐक्याची भावना जागृत केली. तिकडील लोकांना विठ्ठल हे दैवत माहित नव्हते, म्हणूनच त्यांनी विठ्ठलाच्या उपासनेचा आग्रह तिकडे धरला नाही, तेथील लोकांना माहित असलेल्या राम, कृष्ण, हरी, गोविंद अशा नामांनी भजन व उपासना करण्यास त्यांनी शिकविले. लोकांमध्ये उत्साह,धैर्य व आत्मबल निर्माण केले. श्री नामदेवांनी निर्माण केलेल्या भक्तिमय वातावरणाचा परिणाम निश्चितच समाज संघटित होण्यात तर झालाच, पण पुढे निर्माण झालेल्या गुरुनानक, कबीर, तुलसीदास इत्यादी संतांना देखील नामदेवांचे कार्य मार्गदर्शक ठरले.
संत नामदेव महाराजांनी उत्तर भारतामध्ये देव, देश, धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी जे कार्य केले, त्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली व या कार्याला पुढे नेण्याचे कार्य केले, म्हणूनच उत्तर भारतातील सर्वच संतांनी व विचारवंतांनी नामदेवांचा नेहमीच गौरव केला आहे. शिखांचे पाचवे गुरु अर्जुनसिंग यांनी शिखांचा वेद्तुल्य व पवित्र ग्रंथ,ज्याला त्यांच्या पंथांमध्ये *गुरुग्रंथसाहेब* या नावाने गौरवितात, त्यामध्ये श्री नामदेवांची त्यांनी ६१ हिंदी पदे समाविष्ट केली आहेत. श्री नामदेवांच्या पदांना शिख पंथात *गुरुबानी* असे मोठ्या आदराने म्हणतात व त्या पदाचे पठण भक्तीभावाने केले जाते. संत कबीर नामदेवांचा गौरव करताना म्हणतात,
*जागे शुक्र उद्धव,अकुरl हनुमंत जागे लै लंगूरl*
*शंकर जागे चरण सेवl कलि जागे नामा जयदेवll*
तर संत तुलसीदास उदगार काढतात,
*जेही घर नाम कबीराl पहूचे कई तनुमन धीराl*
*अतिहि सुछिम होय जाईl मिले बहमकू साईII*
तर संत मिराबाई म्हणतात,
*साधू की संगत पाई वोI ज्याके पूर्ण कमाई वोI*
*पीपा नामदेव और कबीराl चौथी मीराबाई वोll*
तर गुजरातचे संत नरसी मेहता गौरवोद्गार काढतात,
*आपी कविरानू अविचल वाणीl नामदेवनु हरिशू प्रीतll*
गुरू नानकदेव नामदेवरायांबद्दल म्हणतात,
*नामा छिबा कबिर जुलाहाl पुरे गुरुते पाईII*
तर शिखांचे पाचवे गुरु अर्जुनसिंग जे पूज्य भावनेने म्हणतात ते तर अतिशय महत्त्वाचे आहे. ते म्हणतात,
*नामे नारायणे नाही भेदl*
म्हणजे श्री नामदेव आणि साक्षात नारायण यांच्यात मुळीच भिन्नता नाही, खरोखरच संत नामदेव महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजाला ज्याची गरज होती, त्या सर्व गोष्टी आपल्या अभंग रचनेतून, प्रवचन व कीर्तनातून दिल्या व केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर फिरून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य सुरूच ठेवले व अखेरीस परमात्मा विठ्ठलाच्या चरणी ते समाधिस्थ झाले.
*-डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर*