मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
मंगळवेढा तालुक्यात चालवण्यात आलेल्या छावणी मालकांना देण्यात येणारे अनुदान अद्याप अदा करण्यात आलेले नाही. तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे छावणी अनुदान मिळेल या प्रतिक्षेत असणाऱ्या तत्कालीन छावणी चालक मालकांना हे बिल देण्यात यावे अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशन दरम्यान केली आहे केली आहे.
यासंदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले, तसेच लवकरात लवकर निधी वितरित करण्याची मागणी केली. आमदार आवताडे यांच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांनी येत्या सात दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
तत्कालीन दुष्काळी परिस्थितीमध्ये या छावणी चालकांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात असणारे पशुधन जगण्यासाठी स्वखर्चाने छावण्या चालवून अनेक पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे सध्या मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या छावणी मालकांची आर्थिक बाजू लक्षात घेऊन त्यांना त्यांचे बिल तात्काळ देण्यात यावे अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून छावणी कालावधीत खर्ची केलेले अनुदान आज ना उद्या मिळेल या आशेवर आम्ही सर्व छावणी चालक जगत आहोत. मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आमच्या भावना लक्षात घेऊन या मागणीवर शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवला आहे. आमदार आवताडे यांच्या या संवेदनशील नेतृत्वामुळे छावणी चालकांना वेळोवेळी दिलासा प्राप्त झाला आहे-
निलेश आवताडे, छावणी चालक, आंधळगाव